Skip to main content

वनराईसाठी सैनिकांचा इको टास्क फोर्स


                    दिनांक : 7.7.2017

        आव्हान नवे पेलू चला, हिरवे रान फुलवू चला ! असे म्हणत शासनाने दि. 1 जुलै ते 7 जुलै कालावधीत चार कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला होता. हा निर्धार अवघ्या सहा दिवसातच पूर्ण झाला. मराठवाड्यातही जोमाने वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमावर आधारित हा विशेष लेख.
            ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…वनचरे…’, असं संत तुकारामांनी आपल्याला वृक्षाचे महत्त्व सांगितलं आहे. मराठवाडा तर संतांची भूमी. तरी देखील इथल्या वनक्षेत्राचा विचार केला तर ते अवघं 4.82 टक्के. ‘राष्ट्रीय वन नीती’ नुसार एकूण भूभागाच्या वनक्षेत्र 33 टक्के असायला हवं. पण ते नाहीय, हे वास्तव. राज्यभरात सध्या गतवर्षीप्रमाणे ‘वृक्ष लागवड कार्यक्रम सप्ताह’ उत्साहात साजरा झाला. यामध्ये सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहे. ते होणं स्वास्थदायी समाजासाठी पूरक आणि आवश्यकच आहे. त्यादृष्टीनं समाजाने, शासनाने द्रूतगतीनं पावले उचललीत. यंदाचे ठरविलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट एक दिवस अगोदरच पूर्ण झाले. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभारही मानले. एकूणच वृक्ष लागवड कार्यक्रम मोहिमेचे, चळवळीचे महत्त्व  यातून अधोरेखित होते.
            मराठवाड्यात सर्वात कमी वनक्षेत्र लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. लातूरला रेल्वेने सांगलीच्या मिरजेहून पाणी आणावं लागलं; हे सर्वांना माहीतच आहे. पर्यावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंगच्या बाबतीत सातत्याने चर्चा होत असतेच. पण असं होऊच नये, दुष्काळ पडूच नये, यासाठी अनादी कालापासून संत, महंत, विद्वानांनी  झाडांचं महत्त्व ओळखून जनजागृती केली. परंतु कालांतराने मानवानेच भौतिक सुखापायी झाडांची कत्तल केली. सिमेंटची जंगलं उभारली. ती धोकादायक आहेतच. मात्र आता शासनाच्या वृक्ष लागवड उपक्रमातून झाडांचं महत्त्व जनसामान्यांना पटायला लागलंय. वसुंधरेला वाचविण्यासाठी वृक्ष लागवड, संवर्धनाबाबतची बीजारोपण त्यांच्या मानसिकतेत होते आहे, ही आनंदाचीच बाब आहे.
            वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून उदयास आलेल्या वृक्ष लागवड मोहिमेला आता मिशनचे, चळवळीचे स्वरुप प्राप्त झालं आहे. पहिल्यांदा दोन कोटी वृक्ष लागवड, दुसऱ्यांदा चार कोटी तर आगामी वर्षात 13 कोटी अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने 50 कोटी वृक्ष लागवड राज्यात होते आहे. त्यामुळे पर्यावरण समतोल राहीलच. परंतु निसर्गचक्र देखील, सर्वांना सांभाळून प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाईल. समृद्ध करेल, यात शंका नाही. विकसीत राष्ट्रात वृक्षांच्या कमतरतेमुळं ‘ऑक्सिजन बार’ चा उपयोग करावा लागतो. तशी परिस्थिती तरी वृक्ष लागवडीमुळे निर्माण होणार नाही, हीच मोठी उपलब्धी असेल.
            भारतीय जवान देशाची सेवा अहो रात्र करतात. संरक्षण करतात. आपल्याला सुरक्षित जीवन जगण्याची हमी त्यांच्या या अपार, अतुलनीय कष्टातून देतात. आता तर पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही त्यांनी त्यांच्या मजबूत खांद्यावर घेतली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संरक्षण विभागांतर्गत असलेल्या ‘इको- टास्क फोर्स बटालियनची’ स्थापना औरंगाबादेत करुन राज्यात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमत: राबविण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने आणि अनुभवांनी निवृत्त माजी सैनिकांच्या ‘इको- टास्क फोर्स बटालियन’ ची संख्या वाढविण्यासाठी शासनाने विचार, निर्धार केलेला आहे. बटालियन स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ऑक्टोबर-2016 मध्ये औरंगाबादच्या मंत्रीमंडळ बैठकीत झाला होता. त्याची अंमलबजावणी तत्काळ झाली.
            राष्ट्रीय वन नितीनुसार वनाच्छादन व वृक्षाच्छादन 33 टक्के भूभागावर स्थापित करण्यासाठी वन विभागासह इतर विभागांनी विविध उपाययोजनांसह अंमलबजावणीस सुरुवात केलेली आहे. लक्षांकापेक्षा पुढे जाऊन सर्व विभागांनी  कार्य केले आहे. आता 148 जवान असलेल्या बटालियनच्या माध्यमातून औरंगाबाद वन विभागातील ‘अब्दी मंडी’च्या 60 हेक्टरवर तर मिटमिटा, जटवाडा, जोगवाडा, माळीवाडा, मावसाळा, रसुलपुरा, शंकरपूरवाडी, खिर्डीतील अशा एकूण 1655.95 हेक्टर वनक्षेत्रावर वनीकरण होणार आहे. येथे कडुनिंब, सिसू, करंज, वड, पिंपळ, आवळा, बेहडा, अर्जुन, जांभूळ, चिंच, बांबू, खैर, वनौषधी प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. या झाडांचे संरक्षण, त्यांना आवश्यकतेनुसार पाणी देणे, त्यांचे संगोपन करण्यासाठी बटालियन सज्ज आहे. मराठवाड्यातील वनक्षेत्र कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती उद्भवते. परंतु आता इको-बटालियनच्या मदतीनं म्हणजेच सेवानिवृत्त सौनिकांच्या सहकार्यानं शासनाला परिस्थिती बदलण्यास हातभार लागणार आहे.
            बटालियनला हवं असणारं तांत्रिक, मार्गदर्शन वन विभागामार्फत करण्यात येणार आहे. या प्रयोगामुळे मराठवाडा हिरवागार होण्यास मदत होईल. सुजलाम, सुफलाम् होईल, असं आत्मविश्वासानं मुख्य वनसंरक्षक पी. के. महाजन सांगतात. त्यांच्या वन विभागासह इतर विभाग देखील उत्स्फूर्तपणे वृक्ष लागवड, संवर्धन मोहिमेत सहभागी झाली आहेत.
            मराठवाडा विभागाने झाडांची लागवड केल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे विशेष अभिनंदन, कौतुक केले. विभागीय आयुक्तांनी वृक्ष लागवड, संवर्धनासाठी सर्व यंत्रणांनी पुढे यावे. ग्रामसभेत याविषयावर प्राधान्याने विचार व्हावा. यातून रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. भापकर यांनी पैठण या संत, ऐतिहासिक नगरीत स्वत: जावून तहसील कार्यालय, महसूल प्रबोधिनी, मराठवाडा महसूल विकास प्रबोधिनी, पंचायत समिती कार्यालयात वृक्ष लागवड करुन वृक्ष लागवडीचा संदेश सर्वांना दिला. वृक्ष लागवडीचे महत्त्व सर्वांना समजून सांगितले आहे.
            जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी देखील वृक्ष लागवड मोहीम केवळ आठवडाभर न राबवता सातत्याने वृक्ष लागवड करण्यात यावी. दिसेल व असेल अशा जागी वृक्षांची लागवड करावी. त्याचबरोबर फळ लागवडीचाही विचार करावा. परंतु हरीत मराठवाडा करण्यासाठी सर्वांनी प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
            भारतीय स्थल सेनेचे कर्नल व्यंकटेश यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन महत्त्वाचे आहे. अतिशय अवघड अशा ठिकाणी देशामध्ये उत्तराखंड, जम्मू काश्मिर, दिल्ली, राजस्थान, आसाम व हिमाचल प्रदेश याठिकाणी भारतीय जवानांच्या मदतीनं वृक्षारोपन, वनसंवर्धन करण्यात येते आहे. अगदी त्याचप्रकारे राज्यात पहिल्यांदाच मराठवाड्यातही इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीनं वृक्षसंवर्धन, लागवड निवृत्त भारतीय जवान करणार आहेत. संरक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धन या माध्यमातून होत असल्याने या बाबीचा आनंद वाटतो. सध्या मात्र केवळ एकच बटालियन कार्य करणार आहे. आणखीन दोन बटालियन वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे भारतीय स्थल सेनेचे कर्नल व्यंकटेश आवर्जून सांगतात.  यातूनच त्यांची पर्यावरण, वृक्ष संवर्धनाची तळमळ आपणालाही प्रेरणा देते.
या सर्व बाबी चैतन्यदायी आणि मराठवाड्यासाठी फलदायीच आहेत, हे विशेष. मात्र तरीही प्रत्येकाने किमान एक वृक्ष तरी आयुष्यात लावून त्याचे संगोपन करणेही महत्त्वाचेच. ग्रामसभांतूनही वृक्ष लागवड, संवर्धनाचा जागर प्रत्येकवेळी होणेही मोलाचेच. किंबहुना ते होते आहे, हेही आनंददायीच.
-             श्याम टरके
            माहिती सहाय्यक,
      माहिती केंद्र, औरंगाबाद

******

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्...

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्ध...

नवनवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा ध्यास घ्या - दुष्यंत आठवले

दिनां क : 15.5.201 7           वय 52 वर्ष. उद्योजक होण्याची बालवयापासून मनोमन इच्छा. अंगी शासकीय विद्यानिकेतन ‘उध्दवरावा स्वयें आत्मा’ हा संस्कार. प्रचंड आत्मविश्वास, नवं काहीतरी शोधण्याची नजर अन् कृतीही. वेळप्रसंगी जोखीम घेण्याची तयारी. या वृत्तीने केंद्रीय सरकारी नोकरीही चुटकीसरशी सोडणारा तरुण, मार्गदर्शक, औरंगाबादेतील वैशाली लेझर उद्योगाचे संचालक दुष्यंत आठवले. त्यांच्याशी त्यांनी केलेल्या उद्योग भरारी विषयीची ही विशेष मुलाखत. v दुष्यंतजी आपल्या शिक्षणाबाबत काय सांगाल? माझं गाव नांदेड जिल्हयातील बारड. वडील शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर, आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या शासकीय विद्यानिकेतन या शाळेत झाले. पुढे 1981 मध्ये शासकीय पॉलिटेक्नीक येथून इलेक्ट्रीकल पदविकेस प्रवेश घेतला. त्यानंतर 1984 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग उभारावा असे मनोमन वाटत, परंतु ते शक्य झाले नाही. v शिक्षणानंतर उद्योजक होण्यासाठी काय प्रयत्न केले? उद्योग उभारायचा म्हटल्यावर ...