Skip to main content

Posts

Showing posts from January 16, 2020

निर्भिड, परिणामकारकपणे वक्फ मंडळाने कार्य करावे -नवाब मलिक

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबादच्या राज्य वक्फ मंडळाने पारदर्शक, निर्भिड आणि परिणामकारकपणे कामकाज करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली. पानचक्की परिसरातील राज्य वक्फ मंडळाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. मलिक बोलत होते. यावेळी मंडळाचे सहसचिव एस.सी.तडवी, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख, कायदेविषयक सल्लागार डी. यू. मुल्ला, वित्त अधिकारी  एस. एस. अली कादरी आदींसह मंडळाच्या अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती. बैठकीत वक्फ मंडळाची कार्यपध्दती, रचना आणि मंडळाची परिणामकारकता याबाबत श्री. मलिक यांनी अधिका-यांना मार्गदर्शन केले. वक्फ मंडळ पूर्णत: संगणीकृत करण्याला प्राधान्य असावे, प्रलंबित खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लवकरच मंडळातील सदस्य यांचे विहित मार्गाने नियुक्ती करण्यात येईल. मंडळाच्या कामकाजातील अडचणी दूर करण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही बैठकीत श्री. मलिक यांनी अधिका-यांना आश्वासित केले. ****

प्रजासत्ताक वर्धापन दिनाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी - रिता मैत्रेवार

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका): प्रजासत्ताक वर्धापन दिनासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी संबंधित विभागाच्या यंत्रणांनी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी अधिकाऱ्यांना आज केल्या. प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पूर्व तयारी आढावा बैठक श्रीमती मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार अश्विनी डमरे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत पोलीस आयुक्त, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण, आरोग्य, परिवहन आदी विभागांचा सविस्तर बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच आवश्यक सूचनाही संबंधित विभागांना श्रीमती मैत्रेवार यांनी केल्या. ****