Skip to main content

महाराष्ट्राचे नाथ : संत एकनाथ

दिनांक : 14.3.2017
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील नाथ षष्ठी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा. पंढरपूर यात्रे खालोखाल लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात. सप्तमी, अष्टमीला मोठ्याप्रमाणात उत्सव साजरा होतो. मुख्य पालखीसोबत अंदाजे 600 दिंड्या राज्यभरातून येथे येतात. यामध्ये जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक भाविक श्री एकनाथ महाराजांच्या दर्शनाला महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरुन येतात. काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होते. दरवर्षी यात्रेचे सुनियोजन प्रशासनामार्फत केले जाते. यंदाही जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी नियोजनासंदर्भात पैठण येथे आढावा बैठक घेतली. त्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने भाविकांना सुविधा देण्यावर भर दिला आहे. दिनांक 18 ते 20 मार्च या कालावधीत पार पडणाऱ्या श्री नाथ षष्ठी सोहळयानिमित्त हा विशेष लेख.
संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत. त्यांचे जन्मस्थान गोदावरी काठावरील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण. संत एकनाथ महाराज स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी षष्ठीलाच साजरी करत. पारंपरिक मराठी पंचांग, दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यातील वद्य पक्षातील षष्ठीच्या दिवशी श्री एकनाथ षष्ठी साजरी केली जाते. या दिवशी श्री एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली, असे मानले जाते. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. एकनाथी भागवतातील 18 हजार 800 ओव्यांच्या माध्यमातून श्रीमद् भागवत पुराणाच्या स्कंदावर त्यांनी भाष्य केले. संत एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्तीचा मार्ग ज्ञानाच्या मार्गापेक्षा सोपा आहे, मोक्षासाठी तो पुरेसा असल्याचे सांगितलेले आहे.
श्री एकनाथ महाराजांच्या घराण्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. संत एकनाथ महाराजांना नाथही संबोधतात. नाथांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली, हा इतिहास आहे. पुढे त्यांनी पंढरपुरात सोळखांबी येथे समाधी घेतली. सोळखांबीतून पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाताना उजव्या हाताची पहिली संत भानुदास महाराजांची समाधी आहे.
ज्या ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटला जातो, त्या ज्ञानेश्वरांची समाधी 250 वर्षानंतर लोकांच्या विस्मरणात गेली. परंतु नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध लावला. समाधीचा चौथरा आणि गाभारा नाथांनी बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरु केली. ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथांची लेखणी लोकोद्धारासाठीच झिजली, तळमळली, तळपली, असे श्री. एकनाथपदाश्रित योगिराज महाराज गोसावी (पैठणकर) आपल्या एका लेखात नमूद करतात.
संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते. त्यांनी भारुड, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. कृतीतून दाखवूनही दिले. डोळस कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. संत कवींनी संपन्न केलेल्या भारुड रचनेच्या शैलीला संत एकनाथ महाराजांनी भाषा समृद्धी दिली. अमृताहूनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविली. त्याचबरोबर हिंदी भाषेतही त्यांनी रचना केल्या. भागवत धर्मप्रसाराच्या हेतूने त्यांनी हिंदी भाषेचा कौशल्यपूर्णरित्या वापर करुन भारुडातून रुढी परंपरांवर प्रहार केले आहेत. दोनशेपक्षा जास्त पदे त्यांनी हिंदीतून लिहिली आहेत.
संत एकनाथ महाराजांचे अनेक पैलू आहेत. समकालिनांना ते आदर्श आहेत, तसेच आधुनिकांनाही. संत एकनाथांनी ब्रम्हविद्येचा सुकाळ होता त्यावेळी सामान्यांच्या कल्याणासाठी ग्रंथसंपदा निर्मित केली. इतर संतांपेक्षाही ती अधिक अशीच आहे. त्यात विविधता आहे. यामध्ये चतु:श्लोकी भागवत, भावार्थ रामायण, रक्मिणी स्वयंवर, एकादश स्कंदावरील टीका हे मुख्य ग्रंथ आहेत. तर हस्तामलक, स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, चिरंजीवपद यांसारखी स्फुट आध्यात्मिक प्रकरणे, काही पौराणिक आख्याने व संत चरित्रे आणि असंख्य अभंग व भारुडे आहेत. संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीचेही पहिल्यांदा शुद्धीकरण करुन ती शुद्ध प्रत लोकांना दिली. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान मिळतो. त्यांच्या या प्रचंड वाङ्मयाने केलेले लोकविलक्षण कार्य पाहून संत एकनाथ महाराज हेच महाराष्ट्राचे खरे नाथ आहेत, असे ज्ञानेश्वर महाराज जळगावकर डॉ. कुमुद गोसावी यांच्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हणतात. जे की तंतोतंत खरे आहे.
मराठवाडा संतांची भूमी. त्या संतांच्या भूमीतील संत एकनाथांनी लोकोद्धाराचे महनीय, अतुलनीय असेच कार्य केलेले आहे नव्हे तर कृतीतून त्यांनी करुन दाखविले आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीला आयुष्यभर महत्त्व देऊन प्राणीमात्रांबरोबर, सामान्यांतही देव त्यांनी शोधला.
गुरु जनार्धन स्वामींकडून योगशास्त्राचे धडे घेतले. त्यांच्या आग्रहानुसारच गृहास्थाश्रमही स्वीकारले. भारत भ्रमणानंतर  जीवनभर नाथांनी लोकप्रबोधनाचे कार्य केले. भक्तीची वाट दाखवली. जातीभेद, कर्मकांडाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. संत ज्ञानेश्वरांचे अपूर्ण राहिलेले कार्य त्यांनी पुढे नेऊन वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी तेजाने तळपत ठेवली. कीर्तन, भारुडातून समतेची शिकवण दिली आहे. त्यांच्या या शिकवणीतून आपणही प्राणीमात्रांवर दयेचा, मानव कल्याणचा संकल्प करुयात, त्यांचा संदेश दूरपर्यंत पसरुया. भाविकांच्या या श्री नाथ षष्ठी सोहळ्यासाठी व सोहळ्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन शांती ब्रम्ह संत श्री एकनाथांच्या चरणी नतमस्तक होऊया !
 - श्याम टरके,  
 माहिती सहाय्यक, 
माहिती केंद्र, औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्...

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्ध...

नवनवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा ध्यास घ्या - दुष्यंत आठवले

दिनां क : 15.5.201 7           वय 52 वर्ष. उद्योजक होण्याची बालवयापासून मनोमन इच्छा. अंगी शासकीय विद्यानिकेतन ‘उध्दवरावा स्वयें आत्मा’ हा संस्कार. प्रचंड आत्मविश्वास, नवं काहीतरी शोधण्याची नजर अन् कृतीही. वेळप्रसंगी जोखीम घेण्याची तयारी. या वृत्तीने केंद्रीय सरकारी नोकरीही चुटकीसरशी सोडणारा तरुण, मार्गदर्शक, औरंगाबादेतील वैशाली लेझर उद्योगाचे संचालक दुष्यंत आठवले. त्यांच्याशी त्यांनी केलेल्या उद्योग भरारी विषयीची ही विशेष मुलाखत. v दुष्यंतजी आपल्या शिक्षणाबाबत काय सांगाल? माझं गाव नांदेड जिल्हयातील बारड. वडील शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर, आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या शासकीय विद्यानिकेतन या शाळेत झाले. पुढे 1981 मध्ये शासकीय पॉलिटेक्नीक येथून इलेक्ट्रीकल पदविकेस प्रवेश घेतला. त्यानंतर 1984 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग उभारावा असे मनोमन वाटत, परंतु ते शक्य झाले नाही. v शिक्षणानंतर उद्योजक होण्यासाठी काय प्रयत्न केले? उद्योग उभारायचा म्हटल्यावर ...