‘ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो’चा थाटात समारोप औरंगाबाद,दिनांक 12 - मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य राहील. मराठवाड्यातील दुष्काळ, येथील अडचणी दूर करण्यासाठी, रोजगार निर्मितीत वाढ करण्यासाठी शासनाकडून मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य असल्याचे प्रतिपादन परिवहन, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मराठवाडा लघु उद्योग व कृषी संघटनेच्यावतीने (मसिआ) कलाग्राम येथे आयोजित ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो 2020 च्या समारोपीय कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, विशेष सचिव तथा विकास आयुक्त राम मोहन मिश्रा, ‘मसिआ’चे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, सुनील किर्दक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्री. गडकरी म्हणाले, उद्योग उभा केल्यास संकट येतात. परंतु या संकटाला संधीत रुपांतरीत करावे. उद्योग वाढीसाठी उत्पादनाची गुणवत्ता राखावी. ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. वेळेचे महत्त्व ओळखावे, या बाबी व्यवसायात प्राधान्याने विचारात घ्याव्यात...