स्वच्छता समृध्दीसाठी महत्त्वाची. तशीच आरोग्यदायी जीवनासाठीही. त्यातूनच विकास साधला जातो. मग तो परिसराचा असो वा राज्य, देशाचा. औरंगाबाद शहरात 42 महत्त्वाचे पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची शुक्रवार, दि. 6 रोजी सकाळी 6 ते 9 या वेळेत एकाच दिवशी सर्व शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानिमित्त स्वच्छतेची महती सांगणारा हा विशेष लेख. अनादि कालापासून स्वच्छतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋषी-मुनीही स्वच्छतेला अग्रक्रम देत असत. स्वच्छता आरोग्यदायी जीवनाची गुरूकिल्लीच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला. महात्मा गांधी स्वत: स्वच्छतेला प्राधान्य देऊन नित्यनेमाने साफसफाई करत. त्यांच्या प्रेरणेतून इतरही गांधीजींचे अनुकरण करत. स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपला परिसर, ग्राम स्वत: स्वच्छ करत. संत गाडगेबाबाही स्वत: झाडू घेऊन आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करत. स्वच्छतेबाबत जनजागृती घडवत. ...