Skip to main content

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017
लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’  अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा.


व्हाटस्अप  आणि आई
            व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात.

बुध्दिमत्तेची चुणूक
            तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील आराधखेडा येथून  औरंगाबादेत आले. मनीषा यांना भरपून शिकवून तिला कलेक्टर बनवायचंय, असं त्यांचे आजही स्वप्न आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रत्येक वेळी खंबीरपणानं सातत्यानं मनीषाला प्रोत्साहन दिलं. आपलं शिक्षण चौथीपर्यंत झालं असलं तरी आपल्या पाल्यांना भरपूर शिकविण्याचा ध्यास त्यांनी घेतला. दररोज मातीकाम करूनही मुला-मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. दररोज त्यांचा गृहपाठ घेऊन त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली. प्रेरणा देऊन त्यांना सातत्याने स्पर्धेत यशस्वीतेसाठी आवश्यक गुणांत वृद्धी केली. त्यातच मनीषाच्या बुद्धीमत्तेची चुणूक त्यांना त्याच वेळेस कळल्याने त्यांनी तिला कलेक्टर करायचे ठरवले.  एक मुलगी समुपदेशक आहे तर मुलगा राज्य राखीव पोलीस दलात नोकरी करत आहेत.


प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश
            महापालिकेच्या शाळेतील शिक्षिकेने चुकीचे गुण दिले. पण माझे उत्तर बरोबर आहे, असे मनीषाने त्यांच्या आई लक्ष्मी यांना दुसरीत असतांना सांगितले. त्यामुळे मी त्या शाळेत जाणार नाही अशीच भूमिका मनीषा यांची होती. मग घराजवळ असलेल्या बळीराम पाटील ही नावाजलेली शाळा. मात्र, तिथे केवळ हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, अशी आईला माहिती होती. तरीही मुलीच्या गुणवत्तेवर आईचा दृढविश्वास. त्या आईने शाळेतील शिक्षिकेला, ‘ माझ्या मुलीची हवी ती परीक्षा घ्या, त्यात ती पास झाली तरच शाळेत प्रवेश द्या.’ , असे सांगितले. शिक्षिकेने चिमुकल्या मनीषाची परीक्षा काही अक्षर फळ्यावर रेखाटण्यास सांगून घेतली. फळ्यावर अचूकपणे अक्षरे गिरवल्यानंतर मनीषा यांचा बळीराम पाटील शाळेत प्रवेश झाला.
टर्निंग पॉईंट
            वडील प्रल्हाद दांडगे सातत्याने मुलीला प्रेरणा देत. मनीषाने दहावीत प्रवेश मिळविला होता. मुलगी हुशार आहे. तिला उत्तम गुण मिळणारच हा आई-वडिलांचा विश्वास. निकाल लागला. मनीषा यांना मार्च-2004 च्या माध्यमिक शालांत परीक्षेत 91.16 टक्के गुण मिळाले. मेरीटमध्ये आल्यामुळे सर्वत्र कौतुकाने सत्कार होऊ लागला. असाच सत्कार औरंगाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकास खारगे यांच्याहस्तेही जिल्हाधिकारी कार्यालयात होणार होता. या कार्यक्रमास मनीषांच्या वडीलांची उपस्थिती होती. मनीषाचा सत्कार झाला. सत्कारानंतर मनीषाचे कौतुक करताना श्री. खारगे म्हणाले, मलाही दहावीत एवढे गुण घेता आले नाहीत. तरीही मी जिल्हाधिकारी झालो. त्यामुळे मनीषाच्या पालकांनी मुलीला भरपूर शिकवावे.  श्री. खारगे यांचे ते वाक्य आजही मनात पक्के घर करून आहे. त्यांच्या वाक्यांमुळेच मी माझ्या मुलीला कलेक्टर करणारच अशी वडील प्रल्हाद दांडगे यांनी मनाशी खुणगाठ बांधली आणि तिला बारावीसाठी एस.बी. महाविद्यालयात प्रवेश दिला.
 बारावीतही मेरीट
            दहावीपेक्षा बारावीला अधिक गुण मिळावे, असे आई-वडीलांना वाटत. त्यांची सातत्याने प्रेरणा मिळत असल्याने सातत्यपूर्ण अभ्यास केला. म्हणून 2006 साली बारावीत 95.33 टक्के गुण मिळाले.  अन् मी राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादीत प्रथम आले. त्यामुळे त्यावेळी शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराची दहावी बरोबरच बारावीतही मानकरी ठरले. ही बाब आम्हा सर्वांसाठीच अभिमानाची असल्याचे मनीषा सांगतात.
यशाचा वाटा
            स्पर्धा परीक्षेसाठी किमान पदवीधर असणे आवश्यक असल्याने माझे पुढील शिक्षण मुंबई येथे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इंस्टीट्यूट  येथे पूर्ण झाले. त्यानंतर नोव्हेंबर-2011 नंतर मुंबईतील प्रशासकीय शिक्षणसंस्था व पुण्यातील यशदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा केंद्रात स्पर्धा परीक्षेची तयारी केली. यशदामध्ये संपूर्ण दिवस अभ्यास होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सोपी झाली. सकाळी 6 वाजेपासून दिनचर्या सुरू होत. त्यात केवळ अभ्यास, चर्चा एवढंच असत, तेही रात्री 11 वाजेपर्यंत. त्यामुळेच यशदातील वातावरण, उत्कृष्ट मार्गदर्शन यामुळे 2013 मध्ये मला यश  प्राप्त झाले. माझी पहिली पोस्टींग भंडारा जिल्ह्यातील लाखणी नंतर साकोली व आता चंद्रपुरातील मूल येथे उपविभागीय अधिकारी म्हणून झालेली आहे.
मिशन आयएएस
            वडिलांच्या इच्छेनुसार माझे ध्येय आयएएस होणे आहे. त्यानुसार मी 2012 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुख्य परीक्षेपर्यंत, 2013 मध्ये मुलाखतीपर्यंत तर 2014 मध्ये मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली आहे. परंतु 2017 यावर्षात मी आयएएस परीक्षा पास करण्याचा निश्चय केला असल्याचेही मनीषा आत्मविश्वासाने सांगतात.
चांगले पॅकेज की समाजसेवा ?
            शासन सेवेत आल्यानंतर सर्व सामान्यांसाठी काम करताना खूप आनंद मिळतो. तसे तर मला डॉक्टर व्हायचे होते. परंतु  मी कलेक्टर व्हावे असे वडिलांना नेहमी वाटते. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपजिल्हाधिकारीपदी निवडण्यात आले. माझे बी.टेक (कम्प्यूटर) झाल्याने त्याचवेळेस मला आयबीएम, लखनऊ येथे जॉब मिळाला होता. पॅकेजही चांगले होते. मात्र त्यामुळे मला समाजसेवा करण्याची संधी मिळाली नसती. परंतु आता सर्वसामान्यांचे समाधान माझ्या हातून होत असल्याने मला मोठे समाधान मिळते. लोकांचा माझ्या कामावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याने मला काम करण्याची ऊर्जाही मिळते, असे मनीषा सांगतात.
निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी
            शासन सेवेत आल्यापासून दोन नगरपंचायत व एक जिल्हा परिषद निवडणूक हाताळण्याचा अनुभव मला मिळाला आहे. मतदान हा सर्वांचा अधिकार असून त्याबाबत स्वीप अंतर्गत विविध जनजागृती मोहीम माझ्या कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात मी राबवली. त्यासाठी सर्व अधिकारी – कर्मचारी यांचे मार्गदर्शन वेळोवेळी कामी आले. त्यामुळे सन 2015 च्या निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी पार पाडल्याबद्दल नागपुरात फेब्रुवारी- 2016 मध्ये राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्याहस्ते गौरवही झाला. याचा सार्थ अभिमान  असल्याचे  मनीषा यांना वाटते.
असा असावा अभ्यास !
·        मी राहत असलेला आजूबाजूचा परिसर तसा अभ्यासासाठी अयोग्यच. पण मनात ठरवलं तर  सर्व काही शक्य आहे. पालकांनीही पाल्यांना लहानपणापासूनच प्रेरित करावे. दररोज पाल्यांचा अभ्यास घ्यावा.  माझ्या वडिलांनी मी बारावीत असतांना आमच्या घरचा दूरचित्रवाणी संच बंद ठेवला होता. तसेच घरात जागा अपूरी होती तरीही मला हॉलमध्ये पार्टीशन करून छोटीशी स्वतंत्र जागा अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली होती.
·        नोट्स काढताना त्या ए-4 साईजच्या पानाला दुमडून बुकलेटच्या आकारावर रंगीत पेनाने त्या लिहाव्यात. त्याचे पुन्हा पुन्हा वाचन केल्यास विषय लक्षात राहतो. अशा प्रकारच्या नोट्स कुठेही सोबत घेऊन अभ्यास करण्यास सोपे होते.
·        चर्चा करून अभ्यास केल्यास आठवण क्षमता वाढते. त्यामुळे अभ्यास करा. केलेल्या अभ्यासावर चर्चा करा त्यामुळे संकल्पनांमध्ये सुस्पष्टता येते.
·        ध्येय ठेवा, ध्येय प्राप्तीसाठी अविरतपणे स्मार्ट वर्क करा, निश्चितच यश मिळणारच. मात्र, त्या यशाचा उपयोग समाजहितासाठी करा, असे आवर्जून मनीषा सांगतात.
-         श्याम टरके,
    माहिती सहाय्यक, माहिती केंद्र,     
    औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)