दिनांक : 15.5.2017
वय 52 वर्ष. उद्योजक होण्याची बालवयापासून मनोमन
इच्छा. अंगी शासकीय विद्यानिकेतन ‘उध्दवरावा स्वयें आत्मा’ हा संस्कार. प्रचंड आत्मविश्वास,
नवं काहीतरी शोधण्याची नजर अन् कृतीही. वेळप्रसंगी जोखीम घेण्याची तयारी. या वृत्तीने
केंद्रीय सरकारी नोकरीही चुटकीसरशी सोडणारा तरुण, मार्गदर्शक, औरंगाबादेतील वैशाली
लेझर उद्योगाचे संचालक दुष्यंत आठवले. त्यांच्याशी त्यांनी केलेल्या उद्योग भरारी विषयीची
ही विशेष मुलाखत.
v दुष्यंतजी आपल्या शिक्षणाबाबत काय सांगाल?
माझं गाव नांदेड जिल्हयातील बारड. वडील शिक्षण खात्यात वरिष्ठ
पदावर, आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, माध्यमिक
शिक्षण औरंगाबादच्या शासकीय विद्यानिकेतन या शाळेत झाले. पुढे 1981 मध्ये शासकीय पॉलिटेक्नीक
येथून इलेक्ट्रीकल पदविकेस प्रवेश घेतला. त्यानंतर 1984 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर
उद्योग उभारावा असे मनोमन वाटत, परंतु ते शक्य झाले नाही.
v शिक्षणानंतर उद्योजक होण्यासाठी काय प्रयत्न केले?
उद्योग उभारायचा म्हटल्यावर त्यापुर्वी अनुभव घ्यावा आणि नंतरच
उद्योग करावा, असे विचार येत. म्हणून प्रारंभी अल्मेट फार्मास्युटीकल, अजिंठा कॅपिसीटर,
पुण्यात व्हॅक्युम प्लांट इन्स्ट्रूमेंट येथे सुपरवायझर म्हणून काम केले. पुढे चालून
अनुभव प्राप्तीनंतर एक्सप्रेस इंजिनिअर्स कॉन्ट्रॅक्टरशीप चालू केली. आकाशवाणीतही कनिष्ठ
अभियंता म्हणून 1989 पासून 1998 पर्यंत औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, अंबेजोगाई, अहमदनगर,
राजकोट आदी ठिकाणीही कामाचा अनुभव घेतला. या कामाच्या अनुभव प्राप्तीनंतरच स्वत:चा
उद्योग उभारावा म्हणून प्रयत्न केले.
v लेझर उद्योगाकडे कसे वळलात?
नोकरीत तोच तो पणाचा कंटाळा आला. अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या.
उद्योग उभारतांना अनेकांचे मार्गदर्शन लाभले. विशेषत्वाने पत्नी वैशाली यांचे. त्यामुळे
उद्योग उभारणीला भक्कम पाठबळ मिळाले. मराठवाड्यात केवळ आमच्याकडेच लेझर कटिंगने मेटल
कटिंगची कामे उत्तम दर्जाने केली जातात. पूर्वी लेझर कटिंगसाठी नामांकित कंपन्यांना,
उद्योजकांना पुणे, मुंबई व अहमदनगर याठिकणी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच खर्चही
अधिक होत. परंतु मराठवाड्यातील या एकमेव उद्योगाने आता भरारी घेतली आहे. महिन्याला
10 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून मिळते आहे. त्याबरोबरच ग्राहकांना हवा
असणारा मजकूर त्यांच्या आवडीनुसार डिझाईन करुन, कॉपर वा ब्रास ॲल्युमिनिअम एस. एस.
आदी साधनांवर लेझरच्या सहाय्याने उपलब्ध होत असल्याने, प्रामाणिक, व्यवस्थित व वेळेवर
या त्रिसूत्रीनुसार उद्योगाने अल्पावधीतच आपला ठसा उमटवला आहे.
v उद्योग उभारणीसाठी कोणाचे अर्थसहाय्य घेतले आहे काय?
उद्योग उभारायचा म्हटले की, पैसा हा अविभाज्य असा भाग आहेच.
त्याशिवाय उद्योग उभारलाच जाऊ शकत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे 11 एक्कर जमीन
विकून लेझर उद्योग उभारला. या उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असणारी मशिन 1 कोटी
52 लाख रुपयांची आहे. त्याकरीता कॉसमॉस बँकेच्यावतीने 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले.
घर, जमीन आणि संपत्ती गहाण ठेवली. पत्नी शिक्षिका असल्याने तिच्यामुळे घराच्या जबाबदारीला
आर्थिक हातभार लागला. भाऊ नरेंद्र आठवले, त्यांचा मित्र प्रदीप गाडे यांना उद्योगात
पार्टनर केले आणि आर्थिक बाजू सक्षम केली. यातून आता सात जणांना रोजगार उपलब्ध झाला
आहे.
v आपल्या उत्पादनांना मागणी कशाप्रकारे आहे?
लोकांना हवा असलेला मजकूर, कलाकृती सुबकपणे व आकर्षितरित्या
मेटल, कॉपर आदीवर मिळत असल्याने विविध कंपन्या त्यांची ऑर्डर ऑनलाईन स्वरुपात नोंदवतात.
बहुतांश ग्राहक ऑनलाईनच ऑर्डर करतात. त्यांचे ऑर्डर प्राप्त होताच व्यवहार पूर्ण झाल्यानंतर
तत्काळ त्यांच्या प
त्त्यावर उत्पादने पाठविली जातात. रायपूर, जबलपूर, कोल्हापूर, नागपूर, धुळे आदी ठिकाणाहून ग्राहक ऑनलाईन उत्पादनांची
मागणी नोंदवितात. त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी दिवसाला 3 शिफ्टमध्ये लेझर कटिंग होते.
v नव उद्योजकांसाठी आपण काय संदेश द्याल?
उद्योजक होण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी, ध्यास हा घ्यावाच
लागतो. त्याचबरोबर सामाजिक भानही जपावे लागते. आरोग्याकडेही दुर्लक्ष करुन चालत नाही.
त्यामुळे मी दररोज नित्यनेमाने व्यायाम करतो. आरोग्य चांगले असेल तर आपण व्यवस्थितपणे
कामगिरी पार पाडू शकतो. ग्राहकांच्या समाधानातच समाधानाचे गुपित आहे. म्हणून ग्राहकांना
योग्य व खरे आहे तेच सांगणे मी कटाक्षाने पाळतो. स्वत:तील कौशल्य जाणून ते समाजासमोर
ठेवण्याची कुवत अंगी बानून उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन याचा अभ्यास करुन
ग्राहकांना हवे ते देण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच ग्राहक संतुष्ट होईल आणि उद्योगाला
भरारी प्राप्त होईल.
-
श्याम
टरके
माहिती सहाय्यक,
माहिती केंद्र, औरंगाबाद
Comments