औरंगाबाद, दि. 5 – औरंगाबाद विभागातील आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय रुग्णालय, घाटीच्या सिटीस्कॅन यंत्रासाठी तत्काळ निधी मंजूर करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा, शिक्षण, पाणी, रोजगार या मुलभूत सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे आज सांगितले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा वार्षिक योजना 2017-2018 च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घाटीतील आवश्यक उपचार साधनांपैकी एमआरआय यंत्रासाठी शिर्डी संस्थानच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. सुभेदारी विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी 3 कोटी, शासकीय दंत महाविद्यालयाकरीता 2 कोटी रु. तरतुदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, विभागीय क्रीडा संकुलाकरिता क्रीडा विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करून प्रस्ताव सादर केल्यास क्रीडा खात्याकडून रु. 7 कोटींची तरतूद मार्चमधील पुरवणी मागण्यात मान्य करता येईल असे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. शहरातील विस्तारीकरणाचा विचार करुन नागरिकांना करमणूक सार्वजनिक उद्यान आवश्यक असल्याचे आमदार संजय शिरसाट यांन...