दिनांक
19 जुलै 2017
अजिंठ्याच्या डोंगररांगात म्हणा,की सातमाळ्याच्या रांगात 260.61 चौ. किमीमध्ये
गौताळा अभयारण्य आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं असं अरण्य. बिबट, हरिण, काळवीट, नीलगाय,
सायळ इथे आढळतात. औरंगाबादपासून 75 कि.मी अंतरावर असलेलं गौताळा कन्नड तालुक्यात येतं.
निसर्गसहलीसाठी भेट द्यावं असंच हे ठिकाण. डोंगरदऱ्यांच्या कपारातून वाट काढत, उंचावरुन
कोसळणारे नयनरम्य धबधबे, उंचच उंच डोंगरे, तेही हिरवेगार… डोळ्याचे पारणंच फेडतात.
पावसाळी पर्यटनासाठी एकदा तरी भेट द्यावं, असंच गौताळा अभयारण्य.
गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली. कन्नड
तालुक्यातील 17 गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो. कन्नडपासून केवळ 15 कि.मी.
अंतरावरच अभयारण्य आहे. चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर असलेल्या फाट्यापासून सरळ गेल्यास
गौताळ्याचे प्रवेशव्दार लागते. तिथे चौकी आहे. तिथून आत प्रवेश मिळतो. अभयारण्यात पायी,
वाहनानेही फिरता येते. पर्यटकांसाठी अतिशय चांगल्याप्रकारचे ट्रेकिंग ट्रॅक वन विभागाने
तयार केलेत.
पर्यावरण, निसर्गप्रेमींना, तरूणाईला आनंददायी, आल्हाददायक
असाच अभयारण्याचा परिसर आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी भटकंती करण्याची मजाच काही निराळी, अन् आल्हाददायीही. हिरवाईने नटलेला परिसर, पक्षांचे
आवाज… मनाला प्रसन्न करतात. तसंच ऐतिहासिक, अध्यात्मिक मुक्तीही अनुभवयास देतात. चंडिका
देवीचे मंदिर,अन्य प्राचीन मंदिरे याठिकाणी दिसतात. चंडिका देवीचे मंदिर अभयारण्याच्या
सीमेतच आहे. नवरात्रात भाविकांची मोठ्याप्रमाणात इथे गर्दी असते. वनातील पितळ्खोऱ्याच्या
प्रसिद्ध लेणीसमोर साधे, पवित्र जीवन जगणाऱ्या बौध्द भिक्षूंचा निवास एकेकाळी याच वनात
होता. चंडिका देवी मंदिरापासून काही मीटर अंतरावरच 11 व्या शतकात ‘सिद्धांत शिरोमणी’सारखा
गणितावरील मुलभूत ग्रंथ लिहिणारे थोर गणिती, खगोल तज्ज्ञ भास्कराचार्यांचे पीठही इथेच.
भास्कराचार्यांचे वास्तव देखील याच वनात होते.
अनेक प्रकारची झाडे, वनौषधी याठिकाणी आहेत. चंदनाच्या
वनामधून वाहणारा चंदन नाला आहे. नाल्याच्या काठालाच प्राण्यांची ये- जा असते. काठावरच
पोपट, मोर असतात. विविध रंगांचे पक्षी मनाला मोहीत करतात. रानभाई, सुगरण, बिबट्या,
लांडगा, कोल्हा, नीलगाय, सायाळ, वानर, घोरपड ,साप
आदी प्राण्यांसह 200 हून अधिक पक्षांच्या प्रजाती अभयारण्यात आहेत. बुलबुल,
कोतवाल, चंडोल, गरुड, भारद्वाज, धनेज, पोपट,हरीयाळ आदी. दाट हिरवाईचा हा परिसर आपणाला
भूलवतो. मारोतीचे मंदिर, मंदिरासमोरच गौताळा तलाव. तलावाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर
गवताळ. मनो-यावरून तो पाहता येतो. मारवेल, पवण्या, गोडाळ, चारवळ, कूसळी, बेटेगवत, कूंदा,
शहाडा, शिंपी आदी गवतांच्या प्रजाती येथेच दिसतात. पूर्वी याठिकाणी ‘गवळी’ राहत. त्यांच्या
गाई परिसरात चरत. त्यावरुनच परिसराला गौताळा नाव पडले असावे. अन् तेच पुढे अभयारण्यालाही.
अभयारण्य कन्नड, चाळीसगाव, नागद वनपरिक्षेत्रात आहे. सीताखोरी, सीता नान्ही,
गौतम ऋषी मंदिर, केदार कुंड, धवलतीर्थही पाहण्याजोगे असेच आहेत. गौताळा तलावाच्या पुढे
असलेल्या उंच टेकडीवर एक गुहा आहे. गुहेत गौतम ऋषींची मूर्ती आहे. इथेच ऋषींनी तप केल्याचे
सांगितले जाते. त्यामुळेच टेकडीला गौतम टेकडी नाव पडले आहे.
वनपरिक्षेत्रात
शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियांनातर्गत विविध कामे करण्यात आलेली आहेत.
वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत मोठ्याप्रमाणात झाडांची लागवड झाल्याने भविष्यात अजूनच नयनरम्य
परिसरात मोलाची भर पडणार आहे.
विहंगम असं निसर्गसौंदर्य… याठिकाणी गेल्यासच आपणाला अनुभवता येतं. पावसाळी
पर्यटनाचा आनंदही मनसोक्तपणे पर्यटकांना घेता येतो. वन्यजीव, विभागीय वनाधिकारी विभागामार्फतही
पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा केलेल्या आहेत. पर्यटकांना माहिती व्हावी यासाठी निसर्ग
निर्वचन केंद्रही इथे आहे. आंबा, आवळा, बाभूळ, बेल आदी वनसंपदा, वनौषधींबाबतची माहिती
या केंद्रात आहे. मराठवाड्यात केवळ सुपुष्प वनस्पतीच्या सुमारे 1,650 प्रजाती आहेत.
त्यापैकी 500 हून अधिक प्रजातीचा औषधींसाठी उपयोग होतो. वनौषधीचा खजिना म्हणून गौताळा
अभयारण्याकडे पाहिले जाते.
जुलै ते जानेवारी हा काळ अभयारण्याला भेट देण्याचा
उत्तम असा काळ आहे. औरंगाबाद-धुळे यांना जोडणारा राज्य महामार्ग क्र. 211 अभयारण्यातूनच
जातो. चाळीसगावपासून 20 कि.मी. तर कन्नडपासून 15 कि.मी. अंतरावर अभयारण्य आहे. हिवरखेडा,
पाटणादेवी, पितळखोरा, सायगव्हाण दरवाजातून अभयारण्यात प्रवेश करता येतो. येथूनच हिवरखेडा
गेटपासून अजिंठा 100, वेरूळ 40 कि.मी. तर दौलताबाद किल्ला 50 कि.मी. अंतरावर आहे. औरंगाबाद
ते कन्नड रोडच्या डावीकडील आकर्षक पितळखोरा लेणी समूह सह्याद्री पर्वतराजीच्या सातमाळ
पर्वतश्रेणीत वसलेल्या गौताळ्यात कोरलेले आहे.
वन, वन्यजीव विभागाने उत्तमप्रकारे व्यवस्थापन आणि
संवर्धन करुन जैवविविधतेची जपणूक केली आहे. पर्यटनाच्या सर्वांगाना स्पर्श करणारे हे
ठिकाण त्यामुळेच खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यटक, पक्षी अभ्यासक, पर्यावरणप्रेमी
यांनी यंदाच्या पावसाळ्यात गौताळ्यात निसर्ग सहलीचा, भ्रमंतीचा आनंद घ्यायलाच हवा.
- श्याम टरके,
माहिती सहाय्यक,
माहिती केंद्र,
औरंगाबाद
Comments