शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतून जनतेत वृक्षप्रेमाची गोडी निर्माण झाली. पूर्वी झाड विकत घेऊन लावण्याचा जमाना नव्हता. परंतु आता शासन वृक्ष लागवड मोहीम जोमानं राबवित आहे. त्यात जनतेचा सहभागही भरभरुन मिळतो आहे. म्हणून तर यंदा उद्दीष्टपूर्तीच्या एक दिवस अगोदरच शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेचे आभारही मानले. परंतु या मोहिमेत महत्त्वाची भूमिका असते, ती रोपवाटिकेची. अशाच एका औरंगाबादेतील रोपवाटिकेची भूषणावह अशी वाटचाल. औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून पाच कि.मी. अंतरावर असलेली पैठण रोडवरील पल्ल्वांकुर रोपवाटिका. अगदी संताजी पोलिस चौकीपासून अर्धा किलोमीटरवरील. सुहास वैद्य (वय, 58) यांची. केवळ 500 रुपयांवर सुरु केलेला त्यांचा रोपवाटिकाचा व्यवसाय आज कोट्यवधींचा झालाय. रोपवाटिकेचे रुपांतर आता ‘ट्री मॉल’ (झाडांचा मॉल) मध्ये झालेय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीने या व्यवसायामध्ये शास्त्रशुद्धपणे रसही घेतलाय. सुहास वैद्य यांची सुकृत, संकेत दोन्ही मुलं कृषी पदवीधर, पत्नी सुनीता, वास्तूविषारद सून अभिधा त्यांना या कामात मदत करतात....