दिनांक18 जुलै 2017
अत्यंत साधी राहणी. उच्च विचार. पद अप्पर
विभागीय आयुक्त. कुठलाही आविरभाव, गर्व मनाशी शिवलेला नाही. इर्षा, द्वेष आणि
मत्सरही नाही. कृतीतही दिसत नाही. प्रेमाने समजून सांगण्याची वृत्ती. प्रशासनात असूनही
बरेचजण ‘माऊली’ संबोधतात. कार्यालयातच काम होतं, असं मुळीच नाही. तर ज्या ठिकाणी
संधी मिळेल, मिळवता येईल तिथे काम सुरू. त्यातच अध्यात्माची गोडी. म्हणून कीर्तन,
हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायणातूनही सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर
जागृती करण्याचे कार्य औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार
फड नेटाने पार पाडतात.
जलयुक्त शिवार, शेतकरी आत्महत्या, स्वच्छता
अभियान, पाल्यांसाठी आवश्यक संस्कार, स्पर्धा परीक्षा, शासनाच्या विविध
महत्त्वकांक्षी योजनांवर सातत्याने लेखन डॉ. विजयकुमार फड करतात. हेच विषय
कीर्तनातूनही सांगतात. जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल तर पारंपरिक माध्यमे
प्रभावशालीच. त्याचा पुरेपूर व सुयोग्य पद्धतीने अगदी सामान्यांहून सामान्यांच्या
लक्षात येईल, अशाप्रकारे कीर्तनातून सरकारच्या योजना, लोकांचा आवश्यक सहभाग आपल्या
वाणीतून मांडतात. सामाजिक जाणिवेची भान करून देतात. कर्तव्य, जबाबदारी हाच
भक्तीमार्ग असल्याचे सांगतात. त्यांच्या वाणीला प्रतिसादही भरपूर मिळतो.
मराठवाड्यासह राज्यात त्यांच्या कार्याचा उल्लेख आदराने आणि गौरवाने होतो. सर्व
समाजासाठी प्रेरणादायी असेच ते आहेत. स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धकांसाठी तर ते
गुरूच.
शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर कीर्तन
करताना ते म्हणतात, एकाची आत्महत्या म्हणजे अनेकांची भावनिक, मानसिक हत्याच.
आत्महत्येला अध्यात्मात कुठेच स्थान नाही. आत्महत्या हा अत्यंत चुकीचा आणि
पापाचरणाचा मार्ग आहे. मृत्यू निसर्गाचा अधिकार आहे. त्याचा अधिकार वापरणे,
हस्तक्षेप करणे म्हणजे महत्पापच. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. असायलाही
हव्यात. तेच जीवन असते. म्हणून
त्यापासून दूर जावयाचे नसते. परिस्थितीशी दोन हात करावयाचे असतात. परिस्थितीला
सामोरे जाण्यासाठी शेतक-यांनी खंबीरपणे लढायलाच हवे. शासन शेतक-यांच्या मदतीसाठी
योजना आणते. अंमलबजावणी करते. त्याचा लाभ घ्यायला हवा. आपल्या लेकरा-बाळांना
चांगलं शिक्षण देऊन त्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करणे हेही जीवनातील ध्येयच
असायला हवे. म्हणून केवळ त्यांना चार-दोन शिकवण्या, मोठे महाविद्यालय, शाळा म्हणजे
त्यांचे भविष्य नाही. तर आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर केलेल्या चांगल्या
संस्कारांची शिकवणही पाल्याच्या आई-वडिलांनी देणेही तितकेच महत्त्वाचेच,असल्याचे
ते सांगतात.
शेतकरी आत्महत्या, स्त्री-भृणहत्या पापच.
निसर्गाने दिलेला जन्म हसत-खेळत जगून समाजाच्या उपयोगी आणावा असंच त्यांचं म्हणणं.
कन्या, पुत्र एकच असून त्यात भेदभाव करू नका असं आवर्जून सांगण्याचे कार्य ते
करतात. पटवून सांगतात. समाजाला पटतंही, त्याचं कारण त्यांची अमोघ वाणी. अन् विवेक
बुद्धीतून समाजहितासाठी केलेली शब्दांची मांडणी. नुसतीच मांडणी नाही तर त्यातून
तळमळ दिसून येते. नाहीतर गल्लेलठ्ठ पगार परंतु संसारातच धन्यता मानणारेही आहेतच ना
! मात्र, डॉ. फड यांची कृती पुढे जाण्याचं बळ देते. समाजहिताची गोडी निर्माण करून
देते. ते ‘पगारी नोकरी’ एवढ्या विचारावरच न थांबता, होईल त्या मार्गाने सातत्याने
शासनाची सेवा करतात. सेवेतून जनजागृती करतात.
डॉ. फड यांच्या कीर्तनातून शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त
शिवारांतर्गत करावयाच्या कामाला तर गती मिळालीच. पण प्रत्येकाने या अभियानात योगदान
नोंदविण्याचा आग्रह त्यांनी कीर्तनातून वारकऱ्यांवर बिंबवला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, तत्कालीन
विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी
देखील डॉ. फड यांच्या कीर्तनास उपस्थिती लावलेली आहे, हे विशेष. रोजगार, जॉब
कार्ड, सामुहिक विवाह सोहळे काळाची गरज, जलयुक्त शिवार अभियानातील सहभाग, मागेल
त्याला शेततळे, स्वच्छता अभियान आदी महत्त्वांच्या विषयावर अभंगाच्या निरूपणातून
डॉ. फड विचार मांडतात. मांडून थांबत नाहीत, तर कृतीतून दाखवूनही देतात. त्याचबरोबर
युवा वर्गालाही प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने लेखणीतून ते करतात. स्पर्धा
परीक्षेच्या अनेक मासिक, दैनिकातून त्यांचे विचार भावी अधिकाऱ्यांना घडविण्याचे कार्यही करतात.
पत्रकारिता विषयांतर्गत माहितीच्या अधिकारावर
सखोल आणि अभ्यासपूर्ण संशोधन करून मिळविलेली डॉक्टरेट पदवी त्यांच्या शिकण्याच्या
आणि समाज प्रबोधन, संशोधक वृत्तीचे उत्तम उदाहरणच. एवढ्या मोठ्या विभागातील
कामाच्या व्यापातूनही तरूणांना लाजवेल अशी त्यांची काम करण्याची वृत्ती,
समाजासाठीची धडपड, जनप्रबोधनाचे कार्य अतुलनीय असेच आहे. प्रशासनासह प्रशासनात येणा-या
अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आदर्शवत असेच डॉ. फड यांचे व्यक्तीमत्त्व आहे.
-
श्याम टरके,
माहिती
सहाय्यक,
माहिती
केंद्र, औरंगाबाद.
Comments