दिनांक 19 जुलै 2017 अजिंठ्याच्या डोंगररांगात म्हणा,की सातमाळ्याच्या रांगात 260.61 चौ. किमीमध्ये गौताळा अभयारण्य आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं असं अरण्य. बिबट, हरिण, काळवीट, नीलगाय, सायळ इथे आढळतात. औरंगाबादपासून 75 कि.मी अंतरावर असलेलं गौताळा कन्नड तालुक्यात येतं. निसर्गसहलीसाठी भेट द्यावं असंच हे ठिकाण. डोंगरदऱ्यांच्या कपारातून वाट काढत, उंचावरुन कोसळणारे नयनरम्य धबधबे, उंचच उंच डोंगरे, तेही हिरवेगार… डोळ्याचे पारणंच फेडतात. पावसाळी पर्यटनासाठी एकदा तरी भेट द्यावं, असंच गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली. कन्नड तालुक्यातील 17 गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो. कन्नडपासून केवळ 15 कि.मी. अंतरावरच अभयारण्य आहे. चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर असलेल्या फाट्यापासून सरळ गेल्यास गौताळ्याचे प्रवेशव्दार लागते. तिथे चौकी आहे. तिथून आत प्रवेश मिळतो. अभयारण्यात पायी, वाहनानेही फिरता येते. पर्यटकांसाठी अतिशय चांगल्याप्रकारचे ट्रेकिंग ट्रॅक वन विभागाने तयार केलेत. पर्यावरण, निसर्गप्रेमींना, तरूणाईला आनंददायी, आल्हाददायक असाच अभयारण्याचा परिसर आहे. प...