औरंगाबाद, दिनांक 7- हिंदी प्रचार आणि प्रसारासाठी नावलौकिक प्राप्त, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्य करणाऱ्या हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेच्या प्रधानमंत्री या सर्वोच्च पदावर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील व्यक्तीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेने हा मान प्रा.सुरेश पुरी यांना देऊन त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा असा तुरा खोवला गेला.
आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद करते. १९३५ साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत दक्षिण भारतात हिंदी प्रचार आणि प्रसाराचे कार्य होते. त्यात प्रा.पुरी यांचाही मोलाचा वाटा आहे. यापूर्वी प्रधानमंत्री पदाचा मान हैद्राबाद राज्याशिवाय इतर राज्याला मिळालेला नाही. परंतु प्रा.पुरी यांना हा मान मिळाल्याने त्यांच्या कार्यासह महाराष्ट्र राज्यासाठी देखील त्यांची निवड कौतुक,अभिमानास्पद अशीच आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुमारे 30 वर्ष प्रा.पुरी यांनी वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद विभागात अध्यापनाचे कार्य केले. यावेळी त्यांनी विभागप्रमुख आणि विविध महत्त्वाच्या पदांवर आपला ठसा उमटविला. सन 2010 मध्ये विद्यापीठातून नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2011 पासून हैद्राबादच्या हिंदी प्रचार सभेसाठी परीक्षा मंत्री म्हणून पूर्णवेळ कार्यास सुरुवात केली. विद्यार्थीप्रिय म्हणून त्यांची राज्यात ख्याती आहे.
‘जनसंपर्क संकल्पना आणि सिद्धांत’ हे मराठीतील पहिले जनसंपर्क विषयावरील प्रसिद्ध पुस्तक त्यांनी काढले. आता त्या पुस्तकाचा हिंदी अनुवादही प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांचे विद्यार्थी शासनाच्या माहिती व जनसंपर्क, शासकीय जनसंपर्क यंत्रणा, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीत मोठ्या हुद्यावर अधिकारी पदावर आहेत. हिंदी प्रचारसभेच्या सर्वसाधारण समितीच्या बैठकीत (संचालन) दिनांक 6 रोजी प्रा.पुरी यांची एकमताने निवड झाल्याने त्यांच्या हितचितकांसह, आप्तस्वकीय, सहकारी आणि विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments