औरंगाबाद,दि.7 -
देशात राज्याने जलयुक्त शिवार अभियानात अव्वल कामगिरी केल्याने प्रधानमंत्री नरेंद्र
मोदींनी देखील या अभियानाची दखल घेतली आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र या अभियानाला
जलसाक्षरतेची जोड आवश्यक असल्याने शासनाने जलसाक्षरता प्रशिक्षण केंद्राची स्थापना
करण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्रातूनच खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार अभियान परिपूर्ण
होणार असल्याचा विश्वास जलसंधाण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त
केला.
जल व भूमी व्यवस्थापन संस्था
(वाल्मी) येथील सभागृहात जलनायक, जलयोद्धा उजळणी प्रशिक्षण व चिंतन शिबिरात श्री. शिंदे
बोलत होते. यावेळी जलबिरादरी प्रकल्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह , आमदार
अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वाल्मीचे महासंचालक तथा मृद व जलसंधारणचे
आयुक्त दीपक सिंगला, राज्य जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, उपायुक्त सूर्यकांत
हजारे आदींची उपस्थिती होती.
श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला लोकचळवळीचे
स्वरुप प्राप्त झाले आहे. आजपर्यंत राज्यातील
11 हजार गावे जलयुक्त शिवार अभियानातून परिपूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान जलयुक्त
शिवार अभियानामुळे उंचावले आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकरी सोयाबीन, उडीद
पिकाचे उत्पादन घेऊ लागला आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने शासन जलनायक, जलयोद्धा,
जलकर्मी, जलदूत, जलसेवक अशा उत्स्फुर्त स्वयंसेवकांच्या
माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान परिपूर्ण
होणार आहे. भविष्यात पाण्याची भीषण परिस्थिती ओढवणार नाही यादृष्टीकोनातून नैसर्गिक
स्त्रोतांचे जतन व संवर्धन, पाण्याचा सुयोग्य वापर, नियोजन, पीकपद्धतींचा विचार करुन
नैतिक कर्तव्यातून पाण्याच्या वापराबाबत जनतेत जागृतीचे कार्यही त्यांना पार पाडावे
लागणार आहे. यासाठी शासनाकडून विभागीय केंद्र आणि राज्य जलसाक्षरता केंद्राच्यावतीने
प्रशिक्षण, संशोधन व कृतीतून जागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील पाणीसाठा अत्यल्प
असून आर्थिक ताळेबंद, सुनियोजन व वापरावर जागृती निर्माण करण्याचे कार्य स्वयंस्फूर्तपणे स्वयंसेवकांना करावे लागणार आहे. मराठवाड्यात या
जलसाक्षरता केंद्रातून प्रकर्षाने, प्रभावाने जलसाक्षरतेचे कार्य पार पाडल्या जाईल.
यामध्ये जनतेनेही उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.
डॉ. सिंह म्हणाले, जलयुक्त शिवार
अभियान महाराष्ट्र शासनाची अतिशय उत्तम व कौतुकास्पद
कामगिरी आहे. जनतेला पाण्याबाबत साक्षर करण्याचे कार्य होते आहे, भविष्याचा विचार करता
उत्तम भवितव्यासाठी, शाश्वत विकासासाठी मोलाचीच अशीच ही बाब आहे. महाराष्ट्र शासनाच्या
दूरदृष्टीकोनातून आलेली ही संकल्पना मूर्त
स्वरुपात येत आहे. यातून राज्याचे कल्याणच होईल, असा आशावादही श्री. सिंह यांनी व्यक्त
केला.
पडणारा पाऊस आणि त्या पाण्याचे
केलेले सुनियोजन, योग्य वापर, काटकसर, पीक
पद्धतीचा अवलंब यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. जमिनीत पाणी मुरले पाहिजे त्यासाठी
सकारात्मकपणे सर्वांनी पुढे यायला हवे, यातूनच महाराष्ट्र, मराठवाडा पाणीदार होण्यास
मदत होईल, त्याकरीता जलबिरादरीच्यावतीने सहभाग असेलच. जलसाक्षरतेतून सर्वांचे कल्याण
होईल, असेही श्री. सिंह म्हणाले.
विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी
मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विपूल प्रमाणात कामे झाली आहेत. त्यात लोकांचा सहभागही तितकाच मोलाचा
ठरला आहे. विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून 300 कोटींची जलयुक्त शिवार अभियानाची
कामे झाले आहेत. मराठवाड्याला पाणीदार बनविण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून लोकचळवळ
उभारली जाईल, असे यावेळी श्री. भापकर यांनी सांगितले.
श्री. सिंगला यांनीही सर्वांनी
एकत्र येत जलचळवळीला पुढे नेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक श्री. पुसावळे यांनी केले. सूत्रसंचालन
सहायक प्राध्यापक रुपाली गोरे यांनी केले. आभार मनोहर धादवड यांनी मानले.
Comments