शाश्वत पाण्याचा आधार... जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारची महत्त्वाची, महत्त्वाकांक्षी आणि कमालीची अशी सर्वांच्याच उपयोगाची महत्त्वपूर्ण अशी योजना. ही योजना आता योजना राहिली नसून लोकचळवळ बनली आहे. वर्धा जिल्ह्यातील 214 गावांमध्ये अभियानांतर्गत कामे झाली. आता केवळ 205 कामे शिल्लक आहेत; तीही प्रगतीपथावर आहेत. एकूणच लोकचळवळीतून जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून गावच्या शिवारातील पाणी गावात साठवून भूजल पातळीत वाढ होते आहे. जलसंधारणाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून तयार केलेली ही योजना राज्यासह जिल्ह्याला अधिकच लाभदायी ठरली आहे. आता ही योजना शेतीसाठी शाश्वत असा आधारच आहे. जलयुक्त शिवार अभियानाने शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध करून दिले. शेतीला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यात जलसंधारण, लघुसिंचन विभागामार्फत सिमेंट नालाबांध, खोलीकरण, साखळी सिमेंट नालाबांध, कृषी विभागाकडून नालाखोलीकरण व ढाळीचे बांध, सामाजिक वनीकरणकडून झाडांची लागवड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, वन विभागाकडून वनतळे, समतल चर, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून भूमिगत सिमेंट बंधारा, नाला ट्रेंच, रिचार्ज शाफ्ट आदी कामे जिल्हा वार्षिक योजना आणि विशेष निधीतून करण्यात आली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांमुळे जिल्ह्यात 47 हजार 368 टीसीएम पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. अभियानाअंतर्गत सर्वाधिक कामे कृषी विभागाकडून 1839 कामांपैकी 1774 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित 65 कामे प्रगतीवर आहेत. त्या पाठोपाठ वनविभागाने अत्यंत उत्कृष्ट अशी कामे वन परिसरात केलेली आहेत. तर सर्वाधिक अशी 330 कामे लोकसहभागातून पूर्ण झाली आहेत; हेच या योजनेचे फलित आहे. लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असा फलश्रुतीचा गाभा असतो, तेच याठिकाणी लोकांच्या माध्यमातून घडलेले पाहावयास मिळते. लोकसहभागातून 70150 घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढलेल्या कामांचे रूंदीकरण करण्यात आले. लोकसहभागातूनही अंदाजे 1 कोटींची कामे झाली.
जिल्ह्यात 12 हजार 360 हेक्टरवर ढाळीच्या बांधांचे काम पूर्ण झालेले आहे. प्रति हेक्टर 0.46 प्रमाणे हंगामामध्ये 5 वेळा बांधामध्ये पाणी भरल्याने 2 टीसीएम पाणी उपलब्ध होते. त्याप्रमाणे 24 हजार 720 टीसीएम पाणीसाठा भूगर्भात वाढण्यास मदत होणार आहे. 1 हेक्टर क्षेत्रातून 1 मि.मी मातीचा थर वाहून गेल्यास 10 ते 12 मेट्रिक टन माती वाहून जाते. ढाळीच्या बांधामुळे पाणी व मातीचे संधारण होत आहे. सिमेंट नालाबांधमुळे बंधाऱ्याच्या नजिक विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन सिंचन क्षमतेत वाढ होत आहे, असे ग्रामस्थांना अनुभवयाला मिळत आहे. नाला खोलीकरण व रुंदीकरणाची जिल्ह्यात 523 कामे पूर्ण झाली आहेत. 200 मि.ली प्रमाणे 1 लक्ष 4 हजार 600 मीटर म्हणजेच 104.6 किलोमीटर नाला खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. त्यातून 4 हजार 184 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. हंगामामध्ये किमान 5 वेळा नाला खोलीकरणामध्ये पाणी भरल्यास व जिरल्यास 20 हजार 920 टीसीएम पाणी भूगर्भात जिरविले जाणार आहे. पाणी गावातच अडवून ते जमिनीत जिरल्यास त्याचा फायदा गावकऱ्यांना होऊ लागलेला आहे.
मुंबईच्या सिद्धीविनायक संस्थान, शिर्डीच्या साईबाबा संस्थान, बजाज फाऊंडेशन यांच्याकडून जिल्ह्यातील अभियानाअंतर्गतची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये बजाज फाऊंडेशनकडून शेततळी, विहिर पुनर्भरण, पाझर तलाव, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वनराई बंधारे, गॅबिअन बंधारे आदी कोटीवधींची कामे करण्यात आलेली आहेत. या कामातून शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा स्त्रोत शिवारातच मिळत असल्याने गावच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी मिळाल्याने शेतकरी, ग्रामस्थांना हक्काचे पाणी अभियानामुळे उपलब्ध होण्यास मदत झालेली आहे. शेतीला पाण्याचा आधार मिळाल्याने उत्पन्नाला हातभार लागत आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाला अभियानामुळे निश्चितच बळ मिळणार आहे, हे मात्र नक्की.
- श्याम टरके,
जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा
Comments