औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबादच्या राज्य वक्फ मंडळाने पारदर्शक, निर्भिड आणि परिणामकारकपणे कामकाज करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली.
पानचक्की परिसरातील राज्य वक्फ मंडळाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. मलिक बोलत होते. यावेळी मंडळाचे सहसचिव एस.सी.तडवी, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख, कायदेविषयक सल्लागार डी. यू. मुल्ला, वित्त अधिकारी एस. एस. अली कादरी आदींसह मंडळाच्या अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
बैठकीत वक्फ मंडळाची कार्यपध्दती, रचना आणि मंडळाची परिणामकारकता याबाबत श्री. मलिक यांनी अधिका-यांना मार्गदर्शन केले. वक्फ मंडळ पूर्णत: संगणीकृत करण्याला प्राधान्य असावे, प्रलंबित खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लवकरच मंडळातील सदस्य यांचे विहित मार्गाने नियुक्ती करण्यात येईल. मंडळाच्या कामकाजातील अडचणी दूर करण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही बैठकीत श्री. मलिक यांनी अधिका-यांना आश्वासित केले.
****
Comments