- खुलताबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी घाटीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारी अनुक्रमे दि.22,23 आणि 24 रोजी तर कन्नड, औरंगाबाद तालुक्यातील नेत्ररुग्णांनी दि. 29,30 आणि 31 रोजी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासणीसह नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयात करुन महाआरोग्य शिबिरातील नस्तीसोबत घाटीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचेमार्फत दाखल व्हावे.
- जिल्हा सामान्य रुग्णालयात वैजापूर तालुक्यातील नेत्ररुग्णांनी सोमवार दि. 22 आणि 29 रोजी व गंगापूर तालुक्यातील नेत्र रुग्णांनी दि. 17,24आणि 31 रोजी मोफत शस्त्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.
औरंगाबाद,दि.15- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकत्याच लासूर येथे पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांवर वेळेत उपचारांची प्रक्रिया सुरु आहे. शिबिरात आलेल्या रुग्णांना आवश्यक त्या मोफत शस्त्रक्रियेबाबत संपर्क साधून फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे आजच्या आढावा बैठकीत ठरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे विशेष कार्यअधिकारी संदीप जाधव, घाटीचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. एन.ए. रझवी आदींसह तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवकांची उपस्थिती होती.आढावा बैठकीत आरोग्य शिबिरातील डोळ्यांच्या रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आवश्यक त्या शस्त्रक्रियेबाबत पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्णांनी तालुकानिहाय घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घ्यावा. तालुका समन्वयकांनीही रुग्णांशी संपर्क साधून शस्त्रक्रियेबाबत उपचाराबाबत रुग्णांना अवगत करावे.
नेत्र रुग्णांनी उपचारासाठी तालुकानिहाय वार ठरवून दिल्याप्रमाणे तत्पूर्वी जवळच्या आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनीही ठरवून दिलेल्या दिवसांप्रमाणे रुग्णांना सोयीच्या दिवसांप्रमाणे घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवावे.
एकूण 2022 रुग्णांवरील मोफत शस्त्रक्रिया पार पाडणार असून इतर शस्त्रक्रियादेखील फेब्रुवारी अखेरपर्यंत पार पाडण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी यावेळी केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ,वैद्यकीय अधिकारी,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी शिबिरातील रुग्णांनी संपर्क साधावा. त्याचबरोबर रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांनी संपर्काचा पत्ताही त्यांच्याकडे नोंदवावा. मोफत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे रुग्णांचे आधारकार्ड शिधापत्रिका, पासपोर्ट आकारातील दोन छायाचित्रे सोबत आणावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर रुग्णांना प्रत्येक शासकीय रुग्णालयात रुग्णांना सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे. प्रत्येक रुग्णालयात रुग्ण सहाय्यता केंद्राची उभारणी करावी. प्रशासनासह आरोग्य सेवकांनीही गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ होईल यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. जाधव यांनी यावेळी केले. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, तज्ज्ञांनीही यावेळी विचार मांडले.
****---****
Comments