विघ्न दूर करण्यासाठी आले गणराय ...
कोकणातला गणेशोत्सव अतिशय उत्साहाचा. गोव्यातही मोठ्याप्रमाणात तो साजरा होतोच. माटोळीने विशेष आकर्षण त्या गणरायाचं दिसतं. बाप्पा विघ्नहर्त्या, आमचे विघ्न दूर कर, असे म्हणत सर्वच जण महाराष्ट्रासह देश- विदेशातील गणेश भक्त आज गणरायाची स्थापना करतात. विदर्भातही मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमनासाठी गणेश मंडळं उत्सूक आहेत. काहीं
नी आतापर्यंत गणेशाची स्थापना केलीय, तर आता रात्रीपर्यंत काही जण करतील, एकूणच या उत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा.
विदर्भातील अष्टविनाायकांपैकी एक असलेल्या केळझरचा वरद विनायक वर्ध्यातीलच, हे विशेष. वर्धा-नागपूर मार्गावर असलेल्या सेलू तालुक्यात टेकडीवर वसिष्ठ ऋषींनी स्थापन केलेली ही वरद विनायकाची मूर्ती आहे. अत्यंत मनमोहक आणि निसर्गरम्य अशा परिसराने मनाला शांती मिळते. जागृत गणेश म्हणून तो प्रसिद्ध आहे. वरद विनायक, सिद्धीविनायक या नावाने या गणेशाला संबोधले जाते. केळझरला पांडवांनी वास्तव्य केल्याचेही पोथी वाड्मयात सांगितले आहे. भीमाने बकासुरास येथेच ठार केल्याचे बोलले जाते. श्रीरामचंद्राचे गुरू वसिष्ठ ऋषींचे वास्तव्य याठिकाणी असल्याची नोंद आहे. त्यांनीच या गणेशाची स्थापना केली असून मूर्ती 4 फूट 6 इंच, 14 फूट अशा व्यासाची आहे. 1994 साली महाशिवरात्रीला खोदकामामध्ये शिवलिंग मिळाले. शीवलिलाअमृतात याचा उल्लेख आहे. केळझरला महाभारतात चक्रनगर संबोधलेले आहे. या गावामध्येच जैन पंथांचे आठवे तीर्थंकर चंद्रप्रभू स्वामींचीही मूर्ती सापडलेली आहे, हे या गावाचं वैशिष्ट्य. तसेच विदर्भातील विशेष गणेश स्थापनेचे अजून एक आकर्षण म्हणजे वर्ध्यातील सावंगी मेघे येथील राधिकाबाई मेघे स्मृती ट्रस्टचा गणेशोत्सव. दरवर्षीप्रमाणे यंदाही सांस्कृतिक, सिनेगीत स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
आता गणेशाचे आगमन झालेले आहे. मोठ्याप्रमाणात आणि कर्कश स्वरुपात डीजे, अन् संगीताचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी मात्र आपण सर्वांची आहे.त्याचबरोबर पीओपीच्या गणेशमूर्ती न वापरता आपण शाडूच्या गणेशमूर्ती वापरल्या आणि गणेशाचे विसर्जन घरीच एका बादलीत करून तीच गणेशाची पावन मृदा आपण झाडांना दिली, तर ख-या अर्थाने त्या वृक्षाची साक्ष गणेश असेल, असे मानायला काय हरकत आहे. म्हणूनच आपण या गणेशोत्सव काळात सर्वांनी एकूणच राज्याची आपल्या शेतकरी बांधवांची परिस्थिती पाहता एकतर उत्सव साध्या पद्धतीने आणि इतरांना त्रास होणार नाही, असा साजरा करावा, असे वाटतंय. आपणासह इतरांनाही त्याचे समाधान लाभेलच. विघ्नहर्ता गणेशही आपल्या राज्यावरील पाण्याचे संकट दूर करण्यासाठी दाखल झालेला आहे, हे मात्र नक्की.
- श्याम टरके
Comments