स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करु नका हो...
काल पोळा झाला. काही मित्रांनी सेल्फी,छायाचित्र एफबीवर पोस्ट केले. शेतक-यांचा हा सण सर्वांनीच आनंदाने साजरा केला, खूप चांगले वाटले. परंतु याठिकाणी एक अनुभव आपणा सर्वांशी शेअर करावा वाटतोय. घडले असे, की शेतक-यांची चिंता न करणा-यांना (विश्ोषत: पांढरपेशी समाजाला) अचानकच आमच्या सख्याचा (बैलजोडीचा) एवढा कळवळा आलेला पाहून आश्चर्य वाटले. वर्ध्याच्या माझ्या शासकीय निवासस्थानाशेजारी सायंकाळी सहा- सातच्या सुमारास आजूबाजूचे शेजारी बैलांचा शोध घेत होते. कारण बैलाला नैवेद्य दिल्याशिवाय या बैलांना घरी गिळायला मिळणार नव्हते. म्हणून यांचा बैलांचा शोध सुरू झाला.बैलांचा शोध काही लागेना. क्वार्टरमधे राहणारी पुरूष मंडळी बैलाच्या शोधात आजूबाजूला फिरत होती. शासकीय निवासस्थान असल्याकारणाने इथे दूरवर कास्तकरांचा/ शेतक-यांचा राहण्याचा संबंध नाही. मग आता बैल शोधण्याची मोठी पंचाइत. इकडे आमच्या माता-भगिनी हातात नैवेद्याचा ताट घेऊन आमच्या बैलराजाची वाट पाहत होत्या. पण आपला घरातील महत्त्वाचा सण सोडून बाहेर (सिव्हिल लाईनला) कोण कशाला शेतकरी जाणार... तरीही एक व्यावसायिक बैलाची जोडी घेऊन रात्री उशीरा कॉलनीत आलाच. प्रत्येकी दहा रुपये घेऊन बैलाला नैवेद्य चारण्याची त्याने परवानगी दिली. परंतु काही घरातील बैलांनी त्यांना भूक सहन न झाल्याने अगोदरच पोटोबा केलेला होता. त्यानंतर त्यांनी बळीराजाची पूजा केली.
तात्पर्य - दरवाज्यासमोर कधी गायी, गुरंढोरं आले तर आमच्या गावात त्यांना कोर, चतकोर दुर्डीतील तुकडा आम्ही लहानपणी देत असू. परंतु सिव्हिल लाईनमधे राहिला आल्यापासून असं कधी बघायलाच मिळालं नाही. मग केवळ एका दिवसापुरतं स्वार्थासाठीचं प्रेम करून काय उपयोग... माणसांशीही तुम्ही तसंच वागता, ते तर बिचारे मुकेप्राणी आहेत. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. एकादिवसापुरतंच आपण कृतज्ञ न राहता कास्तकार/शेतक-यांच्या विकासाचा आपण विचार करावा. त्यांचा विकास तरच आपल्या देशाचा विकास.
-श्याम टरके
https://www.facebook.com/shyam.tarke
Comments