☯️राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा
☯️नव मतदारांचा कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
औरंगाबाद,दिनांक 25 : सर्वसमावेशक, नैतिकदृष्ट्या निवडणूक पार पाडण्यासाठी पारदर्शी, निर्भय वातावरणात मतदारांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचे प्रयत्न भारत निवडणूक आयोग करत असते. तरी मतदारांनी सशक्त लोकशाहीसाठी योग्य उमेदवारांची निवड करावी, असे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज केले.
भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू सभागृहात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सिंह होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कुमार सिंगल, डिस्ट्रीक्ट युथ आयकॉन नवेली देशमुख यांची उपस्थिती होती.
श्री. सिंह म्हणाले, भारत निवडणूक आयोग दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक प्रक्रियेत करत आहे. इव्हीएम, व्हीव्हीपॅटचा वापर प्रभावीपणे देशात होतो आहे. पूर्वी या तंत्रज्ञानावर आक्षेप घेण्यात येत होता. परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कोणीही या यंत्रांवर आक्षेप नोंदवलेला नाही. या मतदान यंत्रावर व निवडणूक प्रक्रियेबाबत देशातील सर्व जिल्हाधिकारी यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती केली. मतदारांच्या शंकांचे निरसन केले. नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्याची विभागीय आयुक्त, जिल्हा व पोलिस प्रशासनाची कामगिरीही कौतुकास्पद होती, त्यांचे मी अभिनंदनही करतो, असेही श्री. सिंह म्हणाले.
श्री. चपळगावकर यांनी लोकशाहीच्या प्रतिज्ञेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे आवाहन तरुणांना केले. या प्रतिज्ञेच्या अंमलबजावणीतून देशात मोठ्याप्रमाणात क्रांती निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या प्रौढ मतदार अधिकाराबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. मताचा अधिकार, मतदार नोंदणीची आवश्यकता, पदवीधर मतदार नोंदणीची प्रक्रिया यावरही त्यांनी भाष्य केले. स्वच्छ व पारदर्शी विचारातूनच लोकशाही सशक्त होण्यास मदत होते, म्हणून प्रत्येकाने या दृष्टीने मतदानाचा अधिकार वापरात आणण्याचे आवाहन श्री.चपळगावकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने सातत्याने मतदारांचा समावेश, मतदार यादींची दुरूस्ती, शुद्धीकरण आदी कार्यक्रम राबविण्यात येतात. मतदारांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. मागील वर्षभरात बहुसंख्येने नवमतदारांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावायलाच हवा, असेही श्री. चौधरी म्हणाले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली ध्वनीचित्रफितही यावेळी दाखविण्यात आली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्तचा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा संदेशही यावेळी दाखविण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांनी चित्रकला, वक्तृत्व, भित्तीचित्र आणि निबंध स्पर्धेतील स्पर्धकांच्या कलागुणांचे निरीक्षणही केले. कार्यक्रमात उपस्थितांना मतदाराची प्रतिज्ञाही दिली. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी मानले.
स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण
चित्रकला, वक्तृत्व, भित्तीचित्र आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम उदय कुलकर्णी, द्वितीय विशाल जाधव, तृतीय जे.पी. वैद्य आणि उत्तेजनार्थ इरफान शेख, मनोजकुमार गुप्ता विजेते ठरले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पोर्णिमा तोटेवाड, द्वितीय स्नेहल व्हलगडे, तृतीय प्रतीक्ष सिरसाठ, उत्तेजनार्थ गुंजन पाटील, सिद्दीकी सारा सनोबर, भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम सागर सोनवणे लुकस, द्वितीय ललित बोंडे, तृतीय ललित अत्तर्डे, उत्तेजनार्थ मानसी अपूर्वा, उत्तेजनार्थ श्रृतिका दाभाडे आणि चित्रकला स्पर्धेत प्रथम पूजा गंगावणे, द्वितीय सिद्धी जावळे, तृतीय सृष्टी गाडे, उत्तेजनार्थ अर्बिना शेख, अनिकेत वाघ यांनाही मान्यवरांनी सन्मानित केले.
Comments