सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभागाचा घेतला आढावा
औरंगाबाद, दिनांक 17 : पैठण, औरंगाबादचे रस्ते खड्डेमुक्त असावेत. त्याशिवाय अपूर्ण विकासकामे, रस्ते, पूल, आपेगाव विकास प्राधिकरणाची कामे वेळेत, दर्जेदाररित्या पूर्ण करण्याच्या सूचना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी अधिकाऱ्यांना आज दिल्या.
सुभेदारी विश्रामगृहाच्या बैठक सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत श्री.भूमरे बोलत होते.जिल्हा परिषद सदस्य विलास भूमरे, मुख्य अभियंता खंडेराव पाटील, अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे, कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, सहायक अभियंता राजेंद्र बोरकर आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, कंत्राटदार आदींची उपस्थिती होती.
श्री. भूमरे म्हणाले, कंत्राटदारांनी दर्जेदार कामे करावीत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पैठण तालुक्यातील अपूर्ण विकासकामे नाथ षष्टीपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. वेळेत पूर्ण कामे न करणाऱ्या कंत्राटदारांकडून दंड वसूल करावा, अशा सूचनाही श्री. भूमरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
‘ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी सहकार्य करा’
ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना टप्पा दोन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. भूमरे यांनी शेतक-यांना केले. या योजनेच्या पूर्णत्वामुळे 55 गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात पाण्याची उपलब्धता होणार आहे. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच अधिकाऱ्यांनीही ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना सिंचन विभागाच्या आढावा बैठकीत श्री. भूमरे यांनी केल्या. यावेळी इसारवाडीतील शेतकऱ्यांची अडचणी ऐकून त्या दूर करण्यासाठी प्रयत्त्न करणार असल्याची ग्वाहीही श्री. भूमरे यांनी दिली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ए.पी. आव्हाड, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे राजेंद्र काळे, लघु पाटबंधारे विभागाचे अनिलनिंभोरे आदींसह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*****
Comments