‘ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो’चा थाटात समारोप
औरंगाबाद,दिनांक 12 - मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य राहील. मराठवाड्यातील दुष्काळ, येथील अडचणी दूर करण्यासाठी, रोजगार निर्मितीत वाढ करण्यासाठी शासनाकडून मराठवाड्याच्या विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य असल्याचे प्रतिपादन परिवहन, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मराठवाडा लघु उद्योग व कृषी संघटनेच्यावतीने (मसिआ) कलाग्राम येथे आयोजित ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपो 2020 च्या समारोपीय कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, विशेष सचिव तथा विकास आयुक्त राम मोहन मिश्रा, ‘मसिआ’चे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, सुनील किर्दक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, उद्योग उभा केल्यास संकट येतात. परंतु या संकटाला संधीत रुपांतरीत करावे. उद्योग वाढीसाठी उत्पादनाची गुणवत्ता राखावी. ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. वेळेचे महत्त्व ओळखावे, या बाबी व्यवसायात प्राधान्याने विचारात घ्याव्यात, तरच उद्योगाचा विकास होण्यास मदत होईल. शेतक-यांची मुलं उद्योग जगतात पुढे जात असल्याचा आनंद वाटतो. मराठवाड्याच्या विकासासाठी उद्यमशीलतेचा विकास करण्यावर सर्वांनी भर द्यायला हवा. त्यासाठी गुणवत्तेत मात्र तडजोड करू नका. उद्योग, शेतीचा विकास महत्त्वाचा आहे, त्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकायर् आहेच. मराठवाड्याचा सर्वांगीण विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. औरंगाबाद-अजिंठा रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास येईल. तसेच औरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यावर भर आहे, असेही श्री. गडकरी म्हणाले. आगामी काळात मराठवाडा उद्योग क्षेत्रातील निर्यातीचे शक्तीशाली असे हब होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचे विचार मांडले. मसिआचे राजळे,किर्दक यांनीही मनोगत व्यक्त केले.
सुरूवातीला श्री.गडकरी यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेटी देऊन उद्योजकांशी संवाद साधला. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्री.गडकरी यांच्याहस्ते एक्सपोतील दालन, सहभागी आणि उद्योजकांना मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता पानसरे यांनी केले.
****
Comments