नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता झाली. संत एकनाथांची महती वैष्णवांना
आहेच. संत एकनाथांच्या कार्याची महती पुस्तकातून कळतेच, परंतु प्रत्यक्षातील अनुभूती
त्याहून वेगळीच असते. यावेळीच्या नाथ षष्ठी सोहळ्याचा हा वृत्तांत…
औरंगाबादहून पैठणच्या दिशेने आम्ही दुपारी दोन वाजता निघालो. काही
दिंड्या औरंगाबादच्या दिशेने परतत होत्या. साडेतीनच्या सुमारास पैठणमध्ये पोहोचलो.
काही दिंड्या मंदिर परिसरात होत्या. यावेळी सर्वाधिक दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या
होत्या. या दिंड्यातील वारकरी आपापल्या पालात दिसत होते. गर्दीने मंदिर परिसर फुलून
गेलेला होता. यांच्यातून वाट काढत नाथांच्या दर्शनासाठी थेट मंदिराच्या मंडपात आम्ही
प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या पुजाऱ्यांनी
आम्हा सर्वांचं स्वागत केलं. नाथांचा प्रसाद देऊन शुभाशीर्वाद दिले. नाथांच्या थेट
समाधी दर्शनाने आम्ही तर धन्य झालो. हा क्षण म्हणजे मौलिकच. त्याची तुलना कोणत्याही
ऐश्वर्याशी होऊ शकत नाही. दर्शनानंतरची अनुभूती अवर्णनीयच.
सूर्यास्तानंतर कालाहंडी फोडण्यापूर्वी नाथांचे वंशज रघुनाथ बुवा
महाराज गोसावी यांची पालखी मंदिरात येते. नाथांच्या समाधी मंदिरासमोर संत भानुदास…
संत एकनाथ… ज्ञानबा… तुकाराम… असा गजर कानावर पडतो. पैठणमधील तीन दिवसांपासून जमलेले
वैष्णव काल्याची हंडी फोडण्यासाठी आतूरतेने वाट पाहतात. अन् सुरू होतो… काला दहीहंडी
फोडण्याचा उत्सव आणि नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांचा ओघ मंदिराकडे सुरू
होतो. दुपारी चारपासूनच भाविक मंदिराकडे येतात. मंदिर परिसर, मंदिराचा आतील भाग आणि
बाहेरील भागात भाविक कालाष्टमीचा सोहळा डोळ्यात सामावून घेण्यासाठी आतूर असतात. श्रीक्षेत्र
पंढरपूर पाठोपाठ राज्यातील सर्वात मोठी वारकऱ्यांची ही यात्रा. सर्वांना सुख, समृद्धी, समाधान लाभावे यासाठी वारकरी
इथे येतात. षष्ठीला सुरू होणारा हा सोहळा अष्टमीला
संपतो. तीन दिवसांत वारकरी हरिनामाचा गजर करतात. साक्षात श्रीकृष्णाने नाथांच्या वाड्यात
पाणी भरले, अशी आख्यायिकाही आहे. त्यामुळे श्रीकृष्णाने (श्रीखंड्या) भरलेल्या रांजणाला
दरवर्षी भरण्यासाठीची परंपरा आजही नाथ वंशज जपतात. इमानेइतबारे पुढे नेतात.
नाथषष्ठीचा हा सोहळा डोळ्यात भरून घेण्यासाठी वारकरी खेड्यापाड्यातून
याठिकाणी येतात. नाथषष्ठीचा सोहळा वारकऱ्यांना
पुढे जाण्याचे बळ देतं. आलेल्या प्रत्येक भाविकाला याठिकाणी प्रसन्नचित्त प्राप्त करून
देण्याचा कार्यही या सोहळ्यातून होतं. गोदाकाठचा परिसर, जायकवाडी धरण आणि वारकऱ्यांचा
मेळा जणूकाही प्रति पंढरपूरच…
नाथ षष्ठीचा सोहळा पाहण्यासाठी, नाथांचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील,
परदेशातील भाविकही याठिकाणी येतात. खरंच कालाष्टमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर होणारे
मंदिरातील वातावरण चैतन्यदायीच असते. मनाला ते प्रसन्न करते. भक्तिभावात पावली खेळणारे
वारकरी, टाळकरी, पखवाजवादक यांच्या उत्साहाने मन हर्षोल्लासित होते. तृप्त होतेच. कालाष्टमीच्या
दिवशी नाथांचे तेरावे वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्याहस्ते कालाहंडी फोडण्यात
येते. काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी घरी परततात. त्यानंतर नाथषष्ठी सोहळ्याची सांगता
होते. तीन दिवस या सोहळ्यात संत भानुदास… एकनाथ… यांचा गजर मानवाला आणि त्याच्या चित्ताला
शांत करते. सोहळ्यातील वारकरी चैतन्यदायी होतोच अन् घरी परततो. म्हणून महत परंपरा असलेल्या
नाथ षष्ठी सोहळ्यास संत अभ्यासक, संशोधक यांनी भेट द्यावीच.
-
श्याम टरके,
औरंगाबाद
Comments