दिनांक : 8.3.2018
औरंगाबाद, दि. 8–जागतिक
महिला दिनाचे औचित्य साधुन शासनाने मुली व महिलांसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध
करून देण्यासाठी अस्मिता सॅनिटरी नॅपकिन योजना अंमलात आणली आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होत असून या योजनेचा
लाभ ग्रामीण भागातील महिला, 11 ते 19 वयोगटातील शाळकरी मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन
विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले.
उस्मानपुरा
येथील भानुदास चव्हाण सभागृहात अस्मिता सॅनिटरी नॅपकीन योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी
श्री. भापकर बोलत होते. ही योजना अत्यंत महत्तवाची आहे. बचत गटाच्या माध्यमातून अस्मिता
ॲपव्दारे सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात येऊन मागणीप्रमाणे सॅनिटरी
नॅपकीन माफक दरात महिला बचत गट व्दारपोच करणार आहेत. महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी
शासन कटीबद्ध आहे. या नाविन्यपूर्ण योजनेबद्दल शासनाचे अभिनंदन करायलाच हवे. महिला
सक्षमीकरणासाठी मराठवाडा विभाग सदैव अग्रेसर आहे. 5 लाख युवक युवतींना पुढील काही दिवसात
स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी, शेतकरी, बचत गट चळवळीला बळकटी आणण्यासाठी, उत्तम शिक्षण,
रोजगार, कला, क्रीडा याबाबत विभाग सातत्याने अग्रेसर राहील, याचाच ध्यास घेतला असल्याचे
श्री. भापकर म्हणाले. सॅनिटरी नॅपकीनचा लाभ घेऊन प्रत्येक महिलांनी आरोग्याची काळजी
घ्यावी. त्याचबरोबर सक्षमपणे सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळवावा, असे आवाहनही त्यांनी
केले.
कार्यक्रमास
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, महिला व बालकल्याण सभापती कुसुम लोहकरे,
गंगापूर सभापती श्रीमती गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य श्री. गलांडे, जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती कापसे,
श्री. सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगांवकर यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील
400 महिला व 50 शाळकरी मुलींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता जिजाऊ,
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. भापकर यांनी केले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने
कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक श्री. सिरसे यांनी केले.
Comments