औरंगाबाद, दि. 21 – राज्यात यंदा वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विभागांना उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्रदेखील विभागांना पाठविण्यात आले आहे. त्या प्रपत्रातील आवश्यक माहिती तत्काळ भरून उपवनसंरक्षक कार्यालयाला दिनांक 23 मार्च 2018 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आणि उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत श्री. शेळके बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक एस. पी. वडस्कर, सामाजिक वनीकरण विभागाचे वाय. एल. केसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुनंदा माडजे पाटील, मनपाचे विजय पाटील, श्रीमती जे. व्ही. चौरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे अनुरेखक आर.एस. निकाळजे, एस. पी थोरात, श्रीकृष्ण नकाते, डॉ. जी.आर. संगवई आदींची उपस्थिती होती.
सन 2018 मधील 13 कोटी वृक्ष लागवडी संदर्भात औरंगाबाद जिल्ह्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत सर्व विभागांना कळविलेले आहे. सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या रोपांच्या 31 जानेवारीपर्यंतच्या स्थितीबाबत कळवावे, असेही वनविभागामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर तालुकास्तरीय समन्वयकाचे नाव हुद्दा आणि मोबाईल क्रमांक देखील संबंधित कार्यालयाने वनविभागाला कळवावा, असेही शेळके यांनी यावेळी सांगितले.
वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या करावयाच्या कार्यवाहीबाबत आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन विभागाच्या कार्यालयात सेवानिवृत्त वनअधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करेल, असे यावेळी श्री. वडस्कर यांनी सांगितले.
Comments