औरंगाबाद, दि. 20 –मेकोरॉट या इस्राईलच्या शासकीय कंपनीला आवश्यक असणारी पाण्याशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी आज इस्राईलच्या सदस्यांना दिली.
विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित मराठवाड्याच्या पाणीपुरवठा कृती आराखड्याबाबत इस्राईलच्या डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांच्याशी डॉ. भापकर यांनी संवाद साधला. यावेळी वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, इस्राईलच्या मेकोरॉट कंपनीचे भारतातील प्रमुख रोमील सॅम्युअल, अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, साहेबराव दिवेकर, स्वप्नील सरदार, आदींची उपस्थिती होती.
बैठकीत डिएगो बर्गर, इयरोन गेलर यांनी इस्राईल मधील पाण्याच्या मुल्यमापनाबाबत सविस्तररित्या सादरीकरण केले. पाण्याची साधने, क्षेत्र निवड, लघु, मध्यम आणि दीर्घ नियोजन, प्रशिक्षण, शिक्षण, अंमलबजावणी याबाबतचा सादरीकरणात समावेश होता. परिस्थिती बदलण्यासाठी सुयोग्य पद्धतीने नियोजन करून पाण्याचे वर्गीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जातात. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी शासनाचा भर अधिक आहे. मराठवाड्यातील पीकपद्धतीतही बदल झाला आहे. पाण्याशी संबंधित औरंगाबाद विभागातील आवश्यक असणारी सर्व माहिती यंत्रणेकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असे इस्राईलच्या सदस्यांना डॉ. भापकर यांनी सांगितले.
श्री. बर्गर, श्री. गेलर यांनी इस्राईलनी पाणी वापराबाबत सूचविलेल्या उपायांवर आधारित असलेल्या सेठ सिएगल लिखीत ‘लेट दिअर बी वॉटर’ या पुस्तकाची प्रत डॉ. भापकर यांना यावेळी दिली.
मराठवाड्यातील सद्यस्थितीत पाणीवापराची स्थिती व नियोजनाबाबत डिएगो बर्गर, इयरोन गेलर या सदस्यांना श्री. सिंग यांनी माहिती दिली. तसेच श्री. सिंगला, श्री. टाकसाळे, श्री. लोलापोड यांनीही इस्राईलच्या सदस्यांशी संवाद साधून नावीन्यपूर्ण अशी माहिती जाणून घेतली.
***********************************************************
Comments