औरंगाबाद,दि.8 - प्रसवपूर्व गर्भलिंग
निदान प्रतिबंधक कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावीपणे अंमलवजावणीसाठी जिल्हास्तरीय
सल्लागार समितीमार्फत योग्य अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात येतात. तरीही या
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन
समितीचे अध्यक्ष तथा घाटीचे प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा
यांनी केले.
घाटीच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात श्री. गडप्पा यांच्या दालनात
आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य बालरोग विभागाचे
प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, क्ष-किरण विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वर्षा शेटे, डॉ. घाटकर
आदींची उपस्थिती होती.
डॉ. गडप्पा म्हणाले, सोनोग्राफी केंद्राने सोनोग्राफी करावयाच्या
संदर्भात करावयाच्या सर्व नोंदी व्यवस्थित व अद्यावत ठेवाव्यात. सोनोग्राफी केंद्राकडून
सोनोग्राफी होत नसेल तरीही नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच टूडीइको, सिटीस्कॅन आणि एमआरआयसाठी
नोंदणी आवश्यक आहे. सोनोग्राफी करणाऱ्या नेत्र तज्ञांनीदेखील सोनोग्राफी केंद्र व यंत्रांची
नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सोनोग्राफीचा दरमहा अहवालही वेळेत सादर करावा,
असेही श्री. गडप्पा यांनी सांगितले.
****
Comments