नारेगाव येथील कचरा डेपोची पालकमंत्र्यांकडून पाहणी
औरंगाबाद, दिनांक 23- नारेगाव कचरामुक्त व्हावे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. प्रश्न चर्चेने सुटतात, त्याकरिता आपण सकारात्मक पद्धतीने नारेगावचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू. मात्र, त्यासाठी नारेगाववासीयांनी काही महिन्यांची मुदत प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज केले. नारेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला भेट देऊन श्री. पालकमंत्री सावंत यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई, पुण्याचा कचरा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीदेखील नारेगावच्या कचरा समस्येत लक्ष घातले असून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील शासनाला सहकार्याच्या भूमिकेतून मुदत द्यावी, असे आवाहन श्री.सावंत यांनी यावेळी गावकऱ्यांना केले. पर्यायी जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी जागा शोधतील, परंतु त्याला गावकऱ्यांनीदेखील सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही श्री. सावंत यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.
यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सुभाष झांबड, अतुल सावे, संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनपा आयुक्त डी. एम.मुगळीकर, कल्याण काळे, ग्रामस्थ पुंडलिक अंभोरे, भाऊसाहेब जगताप आदींसह प्रशासकीय, मनपा अधिकारी, पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.सावंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी कचरा डेपोची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ पुंडलिक अंभोरे, श्री.काळे, महापौर श्री. घोडेले, आयुक्त श्री. मुगळीकर यांनी कचरा समस्या आणि उपाययोजनांवर विचार व्यक्त केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला आढावा
नारेगावचा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त दालनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार श्री.खैरे, आमदार श्री. शिरसाठ, श्री.सावे, महापौर श्री.घोडेले, उपमहापौर विजय औताडे, गजानन बारवाल, राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी श्री. राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासह प्रशासन आणि मनपाचे वरिष्ठ अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
Comments