स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
औरंगाबाद,दि.27—राज्यातील महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी पैठणचा नाथषष्ठी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. सर्व भाविकांना योग्य, आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. हा भक्तीमय सोहळा आनंददायी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना श्री एकनाथ महाराज विश्वस्त संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी आज पैठण येथे अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर स्वयंसेवकांनी यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पैठण नगर परिषदेत नाव नोंदणी करुन पुढाकार घ्यावा,असे आवाहनही श्री. सोरमारे यांनी केले.
पैठण येथील कीर्तन सभागृहात नाथषष्ठी सोहळ्याच्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री. सोरमारे बोलत होते. बैठकीस पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, जिल्हा परिषदेचे सभापती विलास भुमरे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, पैठण नगर परिषद मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव, तहसीलदार महेश सावंत,पोलिस निरीक्षक चंदन ईमले, श्री. संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज गोसावी आदींसह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. सोरमारे यांनी विभागनिहाय नाथषष्ठी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. नागरिक आणि प्रशासनाच्या सहभागातूनच हा आनंददायी सोहळा पार पडणार आहे. प्रत्येक यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून कार्य करावे. यात्रेच्या नियोजनात पैठण नगर परिषदेची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. नगरपालिकेने चोख व सुकर व्यवस्था करावी. यात्रा शिबिरात पत्रकारांसाठी कक्ष स्थापन करावा. उपविभागीय अधिका-यांनीदेखील समन्वय ठेवून यात्रा उत्सव आनंददायी वातावरणात पार पडेल, याची दक्षता घेऊन कार्यवाही पार पाडावी, असे आवाहन श्री. सोरमारे यांनी केले.
नाथषष्ठी यात्रेवेळी भाविकांना आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात. यात्रा सुकर व्हावी यादृष्टीने रस्ते, स्वच्छ पाणी, मुबलक प्रमाणात वीज, मुक्काम स्थळे, एसटी सेवा, शौचालये आदी सुविधा भाविकांना उपलब्ध होतील यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. भाविकांना माहिती होण्याच्या दृष्टीने जागोजागी स्वच्छतेच्या संदेशासह माहिती फलके लावावीत. दारुबंदी, अन्न भेसळ, गोदावरी वाळवंट साफसफाई, कायदा सुव्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था, औषधींचा मुबलक पुरवठा, वाहतूक सेवा, धरण परिसरातील कार्यवाही, अग्निशमन सेवा आदींबाबतही श्री. सोरमारे यांनी योग्य त्या सूचना अधिका-यांना केल्या. उत्सव यात्रेच्या संबंधाने खातेनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारीदेखील निश्चित करण्यात आली आहे. त्यादृष्टीने तत्काळ कार्यवाही पार पाडावी. दिनांक 3 मार्च रोजी पुन्हा कार्यवाहीबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
उत्सव काळात वीज बंद राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासंबंधी कक्ष स्थापन करण्यात यावा. पोलीस, तहसील, आरोग्य, पाटबंधारे, दूरसंचार, मंदिर विश्वस्त मंडळ, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा परिषद, मनपा, पशुवैद्यकीय, धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वजन व मापे, पाणी तपासणी आदी विभागांसह सर्व विभागांनी कार्यवाही पार पाडावी.
यावेळी विश्वस्त मंडळाचे श्री. रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज गोसावी, श्री. लोळगे, श्री. भुमरे व पत्रकार, स्थानिकांनी सूचना केल्या. त्यांच्या सूचनांची दखल घेऊन संबंधितांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. सोरमारे यांनी दिले. प्रारंभी श्री.सावंत यांनी सोहळ्याच्या नियोजनाबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती दिली.
Comments