Ø राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा औरंगाबादेत शुभारंभØ देशातील पहिली योजना, भविष्यात 1 लाख लाभार्थ्यांना होणार लाभ
औरंगाबाद,दि.17 – राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सहा मुख्य घटकांसह सन 2017-18 या आर्थिक
वर्षापासून भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात
येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज औरंगाबादेतून होत असल्याने आनंद वाटतो, असे मत पशुसंवर्धन,
दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. शेतकरी, मेंढपाळ, मजुर
आदींच्या पाल्यांनी नियमित अभ्यास करावा. कष्टाने महत्त्वाच्या सर्वोच्च पदांवर पोहचवून
समाजाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले.
पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र
येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत आयोजित
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा शुभारंभ व शेळ्या-मेंढ्यांचे खाद्य बनविणाऱ्या
फिड मिलच्या उद्घाटनप्रसंगी श्री जानकर बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन
खोतकर, आयुक्त कांतीलाल उमाप, अतिरिक्त आयुक्त डॉ. धर्मा चव्हाण, प्रादेशिक सहआयुक्त
डॉ. सुनील राऊतमारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भिकमसिंग राजपूत, जिल्हा पशुसंवर्धन
अधिकारी डॉ. दिगंबर कांबळे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय परकाळे यांची उपस्थिती होती.
श्री. जानकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली
आणि अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पथदर्शी स्वरूपात सुरू करण्यात आलेली राजे यशवंतराव
होळकर महामेष योजना मेंढीपालन करणाऱ्या समाजाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थैर्य
मिळवून देईल. सध्या भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी असलेल्या या योजनेची तरतूद 45
कोटी 41 लाख एवढी आहे. ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आलेल्या या योजनेमुळे पारदर्शक
स्वरूपात लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. भविष्यात या योजनेसाठी भरीव तरतूद करणार असून
1 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवूण देण्याचे उद्दीष्ट ठरविले आहे. प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न् दुप्पट हाईल
यासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यालाच जोड म्हणून पशुधन
विकास महत्त्वाची अशी बाब आहे. पशुधन वाढीसाठीदेखील उद्दीष्ट ठरविले असून राज्यात आगामी
काळात शेळ्यांची संख्या 5 कोटी तर मेढ्यांची संख्या 2.5 कोटी असावी यासाठी पशुसंवर्धन
विभागाने अजून
मोठ्याप्रमाणात प्रयत्न करून जागृती निर्माण करावी. प्रायोगिक तत्त्वावर राज्यात लवकरच
व्हर्च्युअल प्रशिक्षण केंद्रामार्फत
शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले.
पडेगाव येथील विकास प्रक्षेत्र राज्यातील आदर्शवत असे आहे. या
प्रक्षेत्रातून 2 कोटी रूपयांचे ठोंबे विकून महामंडळाला नफा मिळवून दिल्याबद्दल येथील
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूकही श्री. जानकर यांनी केले. महामंडळ नफ्यात असून त्याचे
उत्पन्न अजून वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याचबरोबर पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि
मत्सयव्यवसाय खात्याला नावलौकिक मिळवून द्यावा, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना
सांगितले.
श्री. खोतकर यांनी राजे यशवंतराव
होळकर महामेष योजना कल्याणकारी आहे. या योजनेतून मराठवाड्यातील पात्र लाभार्थ्यांनी
अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन केले. स्थायी आणि स्थलांतरीत पद्धतीने मेंढीपालनासाठी
पायाभूत सोयीसुविधेसह 20 मेंढ्या आणि 1 मेंढानर अशा मेंढीगटाचे 75 टक्के अनुदानावर
वाटप करण्यात येते. हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र
खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदानावर देण्यात येते. पशुखाद्य कारखान्यासाठी 50 टक्के
अनुदार देण्यात येते. अशाप्रकारच्या आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याऱ्या योजनेचा लाभ
पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे श्री. खोतकर म्हणाले.
सुरूवातीला
पात्र लाभार्थ्यांच्या मेंढी गटाची पाहणी श्री. जानकर, श्री. खोतकर यांनी केली. त्यानंतर
फिडमिलचे उद्घाटन श्री. खोतकर यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन श्री. जानकर यांनी करून
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा शुभारंभ केला. कार्यक्रमात योजनेचे लाभार्थी वर्षा
चोरमारे, निलेश पल्हाळ, दौलत मंचरे, श्रीराम गोरे, भगवान गायके, ज्ञानेश्वर मिसाळ,
मंदा जानराव, तुलसीराम धनट, सखाहारी बनसोड, राजेंद्र गोराणे, साहेबराव गावडे, नगाबाई
कोकरे, महादू कोळपे, नवनाथ रूपनर, भाऊसाहेब घोडके, गणेश बरकडे, लालबा पोकळे, सचिन टेंगले,
लक्ष्मण कोकरे, अनिता गुलदगड यांना श्री. जानकर यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन लाभ देण्यात
आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाप यांनी केले. सूत्रसंचालन श्री. परकाळे यांनी केले.
आभार श्री. राऊतमारे यांनी मानले.
******
Comments