औरंगाबाद,दि.16 – दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र
आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात
भरारी घ्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले.
हॉटेल
विंडसर कॅसल येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती
हबच्या 19 व्या राज्यस्तरीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देसाई बोलत होत.
यावेळी सुक्ष्म व लघु मंत्रालयाचे संचालक पीजीएस राव, पी. उदयकुमार, आर. बी. गुप्ते,
उद्योग संचालनालयाचे सहसंचालक दिलीप गुरूलवार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे क्षेत्रीय
प्रमुख पी. कृष्ण मोहन, बुद्धीष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड ट्रेडर्स असोसिएशनचे
अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखे, उच्च अधिकार नियंत्रण समितीचे सदस्य सुनील झोडे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव
किर्लोस्कर यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून सुरूवात केली. परंतु सातत्य आणि जिद्दीच्या
बळावर त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. लघु
उद्योजकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन राज्य व केंद्र शासनाच्या विविध
कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन बडे उद्योगपती होण्याचा ध्यास घ्यावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षात राज्य
सरकारने अनुसूचित जाती जमातीतील उद्योजकांना व्यवसायाकरिता प्रोत्साहित करण्यासाठी
भरीव तरतूद केली आहे. त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. भांडवली अनुदान, व्याजाचे
अनुदान, विजेची सवलत, भूखंडांमध्ये राखीवता आदी योजना राबविण्यास सुरूवात केली आहे.
विविध कार्यालयांना लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी लघुउद्योजकांच्या 241 वस्तूंची देखील
निवड केली आहे,असेही श्री. देसाई म्हणाले.
राज्यात क्लस्टर विकासाला
चालना देण्याचे काम राज्य सरकार कार्य करत आहे. यामध्ये औरंगाबादमध्ये पैठणी, उस्मानाबादमध्ये
खवा आणि नांदेडमध्ये प्रिंटींगचे क्लस्टर उभारले आहे. उद्योगक्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी
महाराष्ट्राने जीएसटीवर देशात पहिल्यांदा धोरण केले आहे. महिलांनीही उद्योग क्षेत्रात पुढे यावे याकरिता स्वतंत्र महिला
धोरण तयार केले आहे, ही भूषणावह अशीच बाब असल्याचे श्री. देसाई यांनी आवर्जून सांगितले.
शासनाने वेगवेगळी 12 औद्योगिक धोरणे तयार केली आहेत. तरूण, महिला
यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. महिलांना परदेशातील प्रदर्शनात भाग घेण्यासाठी
प्रतिव्यक्ती 50 लाख तर उत्पादनाचा ब्रँड तयार करण्यासाठी 1 कोटी रू. देण्याची भरीव
तरतूद राज्याच्या धोरणांमध्ये
करण्यात आली आहे. लघुउद्योजकांनी सरकारच्या या योजनांचा लाभ
घेऊन प्रगती करावी. शासन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही श्री. देसाई
यांनी यावेळी दिली.
बैठकीची सुरूवात राष्ट्रगीताने
झाली. त्यानंतर श्री. देसाई यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून एकदिवसीय बैठकीचा प्रारंभ
झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उदयकुमार यांनी केले. हबबाबत सविस्तर माहिती
पीजीएस राव यांनी दिली. यावेळी मराठवाडा विभागाच्या उद्योजक माहिती पुस्तिकेचे विमोचनही श्री. देसाई यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ ला यशस्वी करा
‘मेक इन इंडिया’ ला
मोठ्याप्रमाणात यश मिळाले. सन 2016 ते 18 या कालावधीत 2 हजार 121 उद्योग राज्यात स्थापन
होत आहेत. यामाध्यमातून 8 लक्ष कोटींची गुंतवणूक झाली. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांच्याहस्ते दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे उद्घाटन होत असलेल्या ‘मॅग्नेटिक
महाराष्ट्र’ या जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार
घ्यावा व यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले. या परिषदेतून 10 लक्ष कोटी रूपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीच्या
प्रस्तावाचे उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले.
******
Comments