औरंगाबाद,दि.26- लिंबेजळगाव
येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय इज्तेमा सोहळ्यास मोठ्याप्रमाणावर भाविकांची उपस्थिती
होती. सोहळ्यासाठी संयोजकांमार्फत चोख व्यवस्था करण्यात आली होती. संयोजकांकडून उपलब्ध
सोयी-सुविधांवर सनियंत्रण, प्रसंगी शासकीय विभागामार्फत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी
एकूण 250 अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली
होती. सोहळ्यात चोख व व्यवस्थितपणे कामगिरी पार पाडल्याबद्दल या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे
विशेष कौतूक करत जिल्हाधिकारी श्री. राम यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याचे निवासी
उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.
लिंबेजळगाव
येथील इज्तेमा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 13 नोडल अधिकाऱ्यांची
नियुक्ती व त्यांच्या अधिनस्थ 235 कर्मचाऱ्यांच्या पथकांची स्थापना जिल्हाधिकारी श्री.
राम यांनी केली होती. वैजापूरचे उपविभागीय
अधिकारी यांनी मुख्य संनियंत्रण अधिकारी आणि
गंगापूर तहसीलदार यांनी सहाय्यक मुख्य संनियंत्रण अधिकारी म्हणून कामगिरी बजावली. इज्तेमा
सोहळा व्यवस्थित पार पाडण्यात यावा याकरिता सोहळ्याच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी पूर्वतयारी आढावा बैठका घेतल्या.
जिल्हा
प्रशासनातर्फे सोहळ्याच्या पूर्वतयारीवेळी कार्यशाळादेखील घेण्यात आली. त्यामुळे सोहळ्याठिकाणी
आवश्यक असणाऱ्या सोईसुविधा अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात
आल्या. यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ,पाणीपुरवठा विभागाच्यावतीने सुरळीत पाणीपुरवठा
करण्यात आला. पाण्याची कमतरता सोहळ्याठिकाणी भासू नये, यासाठी वाळूज एमआयडीसीतून पाणी
उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमस्थळी 24 तास वीज पुरवठा करण्यात आला. कार्यक्रठिकाणी
संयोजकांमार्फत अन्नपुरवठा करून जेवण तयार करण्यात येत होते. त्याठिकाणच्या अन्नाची
गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने 10 निरीक्षकांव्दारे तपासणी करण्यात
येत होती. अद्यावत औषध पुरवठा, वैद्यकीय पथके, 12 रूग्णवाहिका कार्यान्वयीत करून आरोग्य
यंत्रणेमार्फत कार्यवाही पार पाडण्यात आली. जिल्ह्यातील नगरपालिका व महानगरपालिकांची
12 अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी स्वच्छता व आरोग्य
अबाधित राखण्यासाठी नगरपालिका, महापालिकेतर्फे स्वच्छतागृहे, स्नानगृहांची व्यवस्था
करण्यात आली होती. कचरा व तत्सम प्रकारात शोषखड्डे
यामधून पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होईल यासाठी 24 तास पथके तैनात करण्यात आली होती.
साठवलेल्या पाण्यात योग्य प्रमाणात क्लोरिनचा वापरदेखील प्रशासनामार्फत याठिकाणी करण्यात
आला. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणेशी समन्वय साधून प्रादेशिक परिवहन विभागाने
कामगिरी पार पाडली. भाविकांना ने-आन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या
बसेसची व्यवस्थादेखील योग्य प्रकारे करण्यात आली.
नोडल
अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. सोनुले,
जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे, महाराष्ट्र जीवन
प्राधिकरणाचे पी.डी. भामरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. भगत, अन्न व औषध प्रशासनचे
सी.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोवर्धन
गायकवाड, महापालिकेचे अग्निशामक विभागप्रमुख आर.के. सुरे, स्वच्छता विभागाचे विजय पाटील,
एस.टी. महामंडळाचे विभागनियंत्रक रा.ना. पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र
खराडे, भूजल सर्वेक्षणचे जी. डी. महाजन यांनी चोख व व्यवस्थितपणे इज्तेमा सोहळ्यात
कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतूक, अभिनंदन श्री. राम यांनी
केले.
*****
Comments