औरंगाबाद,दि.15 - बोंडअळी, गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची आज
पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी
थेट संवाद साधला. त्याचबरोबर होणाऱ्या नुकसानीबाबत हानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये
जनजागृती निर्माण करा, असे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सिल्लोड तालुक्यातील वरखेडी, बनकिन्होळा आणि फुलंब्री
तालुक्यातील नायगव्हाण, महालकिन्होळा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची
पाहणी डॉ. सावंत यांनी केली, शेतकऱ्यांशी संवादही साधला. वरखेडी येथे जिल्हाधिकारी
नवलकिशोर राम यांच्याहस्ते पालकमंत्री डॉ. सावंत यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ
देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर , अप्पर जिल्हाधिकारी
पी.एल.सोरमारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तालुका कृषी अधिकारी श्री. आघाव आदींची उपस्थिती
होती.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी
येथील संतोष फलके यांच्याशेतात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादन पिकांबाबत
सविस्तर माहिती पालकमंत्री डॉ. सावंत यांना दिली. श्री. फलके यांच्या शेतीतील कापूस
पिकांची पाहणी करुन यापुढे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अशा समस्यांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी कृषी
विभागाने जनजागृती मोहीम राबवावी, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. त्यानंतर सिल्लोड
तालुक्यातीलच बनकिन्होळा येथील शेतकरी विठ्ठल जैस्वाल यांच्या हरभरा पिकाची पाहणीही
डॉ. सावंत यांनी केली. येथे माजीमंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी तालुक्याच्यावतीने
डॉ. सावंत यांना मागणीचे निवेदन दिले.
नायगव्हाण याठिकाणी कृषी विभागाच्यावतीने
कोरडवाहू शेती अभियानांतर्गत अनुदान प्राप्त लाभार्थी कोकिळा जंगले यांच्या शेतात गोपूजन करुन त्यांच्या तुती लागवडीचीदेखील
डॉ. सावंत यांनी पाहणी केली. तसेच येथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. महालकिन्होळा
येथे मंगल कापरे यांच्या जांब व आंबा पिकांची पाहणीही डॉ. सावंत यांनी केली. यावेळी
फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी श्री. जाधव, तहसीलदार संगिता चव्हाण यांचीही उपस्थिती
होती. पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या समवेत अंबादास दानवे, नरेंद्र
त्रिवेदी, अण्णासाहेब माने, सुहास दशरथे आदींची उपस्थिती होती.
रोटाव्हेटर, ट्रॅक्टरचे पालकमंत्र्यांच्याहस्ते वितरण
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत
देण्यात येणाऱ्या रोटाव्हेटर, ट्रॅक्टरचे फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील पात्र
लाभार्थी यांना पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये सुरेश बोलकर आणि सोमिनाथ
मते यांना ट्रॅक्टर तर मंगेश मते, युनुस गुलाबशहा, विनोद पंडितराव जाधव , सुदाम मते
यांना रोटाव्हेटरची चावी देऊन योजनेचा लाभ देण्यात आला. यावेळी श्री. कुलथे, एस.आर.
घनबहादूर, राम साळुंके आदींची उपस्थिती होती.
******
Comments