औरंगाबाद : प्राचीन काळापासून सुरक्षित चिकित्सापद्धती म्हणून होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी केंद्राच्या आयुष मंत्रालयामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षण, संशोधनाला यामध्ये प्राधान्य देण्यात आले असून या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांची सेवा व्हावी हा उद्देश असल्याचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
पडेगाव येथील सायली चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.नाईक बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ.दिलीप म्हैसेकर, आमदार अतुल सावे, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रामजी सिंह, उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक म्हणाले, केंद्र सरकारने होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. देशात 218 महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी या शिक्षणाकडे वळले आहेत. देशात होमिओपॅथी शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा. त्या माध्यमातून चांगले डॉक्टर्स घडावेत. रुग्णांची सेवा उत्तमप्रकारे त्यांच्या माध्यमातून व्हावी, यामागील उद्देश आहे. असाध्य रुग्णांना बरे करण्याचे कार्य होमिओपॅथीतून करण्यात येते. सकारात्मक समाधानासाठी अग्रणी चिकित्सा म्हणून होमिओपॅथीकडे पाहिले जाते. जगातील 80 देशात होमिओपॅथीवर शिक्षण, संशोधन होत आहे. भारतात देखील होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद शिक्षण, संशोधनावर भर देण्यात येतो आहे. नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले इस्त्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष मंत्रालयाशी संबंधित एक करार केला आहे, ही आनंदाची बाब आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीने देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनाला चालना देण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी होमिओपॅथी बाबत संशोधनावर भर देण्याचे आवाहनही श्री.नाईक यांनी केले.
औरंगाबादेतील सायली ट्रस्टमध्ये अनेक विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेने होमिओपॅथीचे शिक्षण घेतील. या शिक्षण संस्थेतून अनेक चांगले, उत्तम दर्जाचे डॉक्टर घडतील. औरंगाबादच्या शैक्षणिक वातावरणातून अधिक मोलाची भर पडेल, असा आशावादही श्री.नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार अतुल सावे, माजी आमदार कल्याण काळे, कुलगुरु म्हैसेकर, डॉ. सिंह, डॉ. भस्मे, श्री. कदम, डॉ.शांतीलाल देसरडा यांनी यावेळी विचार मांडले. सुरुवातीला कोनशीलेचे अनावरण श्री. नाईक यांच्याहस्ते झाले. त्यानंतर दीपप्रज्वलन व स्वागत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.
Comments