दिनांक 12 जानेवारी 2018
जिजाऊ शिवबांच्या आदर्श
माता, आदर्श गुरूही. कर्तृत्वान, वात्स्ल्य, ममता, मुत्सद्दीपणा, उत्तम
निर्णयशक्ती, आत्मसन्मान, तल्लख बुद्धिमत्ता, दृढनिश्चय, विनयशीलता, संघटनकौशल्य,
औदार्य, महत्त्वाकांक्षा, त्याग, नि:स्वार्थीवृत्ती अशा विविध गुणांचा राजमाता,
राष्ट्रमाता जिजाऊ संगमच. माँ जिजाऊंचा आज जन्म दिवस त्यानिमित्त त्यांच्या महान
कार्याला स्मरण करून कोटी कोटी वंदन.
शिवबांच्या
जडणघडणीत जिजाऊंचा अनमोल असा वाटा. जन्मापासूनच
शिवबांना राजमाता जिजाऊंचा सहवास अधिक लाभल्याने असाधारण अशी मातृभक्ती त्यांच्यात
निर्माण झाली. हिंदवी स्वराज्याची
संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य,
चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ
आऊसाहेब! रयतेवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करण्याचे बाळकडू ज्या मातेने दिले
त्या म्हणजे राजमाता जिजाऊ.
जिजाऊंचा
जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथला. देवगिरी, यादव वंशातील
लखुजीराजे जाधव, म्हाळसाबाई यांच्या त्या कन्या. लखुजीराजेंचे घराणे वैभवशाली,
समृद्ध. जिजाऊंचे बालपण अत्यंत लाडात गेले. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे
पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होतेच. लिहिणे, वाचणे आणि घोड्यावर
रपेट मारणे, राजकारण या सर्व बाबींचे शिक्षण लहानपणीच लखुजीराजे यांच्याकडून
त्यांना मिळाले.
ज्या
वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात बालक दंग असत, त्या वयात जिजाऊ
माँसाहेब तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजीराजेंकडे
त्या हट्ट करत. जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या
लेकीला अशा कथा सांगून त्यांच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले.
विदर्भाच्या
कन्या, मराठवाड्याच्या सून आणि पश्चिम महाराष्ट्रात वास्तव्य अशा भूमिकांतून मॉ
जिजाऊंनी राष्ट्रनिर्माणाची धुरा चोखपणे सांभाळली. पती शहाजीराजे मोहिमेवर असताना
डोळ्यातून तसूभरही अश्रू न ढाळता खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना
साहसी पाठबळ दिले. आदिलशाही, निजामशाही काळात अस्थिर चक्र त्यांनी अनुभवले.
पिकवायचं
आपण, कणगी मात्र बादशहाची भरायची. घाम गाळायचा आपण अन् पोट पण भरायचं नाही.
समाजाची अशी दयनीय अवस्था माँ जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय-अत्याचाराविरुद्ध
चीड येत. शहाजीराजे सतत मोहिमेवर असत.
परंतु त्यांच्यामागे माँ जिजाऊंनी जहागिरीचा कारभार पाहण्यास सुरूवात केली. हिंदवी स्वराज्याच्या आड येणा-यांशी लढण्याचं
धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या
संस्कारांतूनच.
जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसलेंशी
झाला. त्यानंतर त्यांनी परमप्रतापी, युगपुरूष शिवबांना जन्म दिला. जन्मापासून
शिवबांना माँ जिजाऊंचा अधिक सहवास लाभला. त्यांच्या शिकवणीतूनच रयतेच्या
कल्याणासाठी, हिंदवी स्वराज्याच्या निर्माणासाठी छत्रपती शिवरायांनी धडपड केली.
अटकेपार झेंडे फडकवून महापराक्रमी, जाणता राजा म्हणून लौकिक मिळविला. अनेक गड
किल्ल्यांचे मालकी हक्क माँ जिजाऊंच्या चरणी शिवबांनी अर्पण केले. अशा महान
योद्धा, श्रीमंत योगी महापुरूष, पराक्रमी राजांच्या मातोश्री म्हणून राष्ट्रमाता
जिजाऊंची विश्वात ओळख आहे.
माँ जिजाऊ साहेबांनी शिवरायांच्या मनात
कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच शिवबांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची
वृत्ती आणि अन्याय करणा-याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडसही त्यांनीच
शिवबांना दिलं. अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या
मोहिमांवर असताना, खुद्द माँ जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत, हे विशेष.
मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारा
जाणता राजा छत्रपती शिवराय, अन् त्यांच्यात हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवून माँ
जिजाऊंनी अजरामर असे कार्य केले. माँ जिजाऊ यांच्या संस्कारांच्या जोरावरच छत्रपती
शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडित काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना
केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची
फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या.
अशा असामान्य, शूरवीर, चातुर्यवान माँ जिजाऊंचा आज जन्म दिवस. त्यानिमित्त त्यांना
कोटी कोटी वंदन !
मुलाच्या जन्माआधी त्यांच्या जीवनाचं
ध्येय ठरवणा-या या महान, आदर्शवत राष्ट्रमातेचे विचार प्रत्येकाने अंगीकारणे
आवश्यकच आहे, हे शाश्वत सत्य आहे. अन् ते अंगीकारायलाच हवे. ते आपले आद्य
कर्तव्यच आहे.
- श्याम टरके, औरंगाबाद
मो.क्र. 9860078988
shyamtarke@gmail.com
Comments