औरंगाबाद, दि.10 - केंद्र
आणि राज्य शासनाच्या शहरी विकासासाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवून
नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रासह शहरांच्या विविध विकासकामांना गती देण्याचे
निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या
बैठकीत श्री. खैरे बोलत होते. यावेळी आमदार सुभाष झांबड,
महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन
बारवाल, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपजिल्हाधिकारी
अंजली धानोरकर, महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, सिकंदर अली,श्री.
कुलकर्णी, सर्व नगरपालिका,नगरपंचायतचे मुख्याधिकारी, मनपाचे अधिकारी, पदाधिकारी
यांची उपस्थिती होती.
बैठकीत स्वच्छ भारत मिशन, हेरीटेज सिटी विकास, अंत्योदय योजना,
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अटल अभियान (अमृत), स्वच्छ भारत अभियान (नागरी),
दीनदयाल अंत्योदय योजना, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना,
औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटी योजना, राष्ट्रीय शहरी आरोग्य योजना, रस्ते विकास
आदी योजनांचा सविस्तर आढावा श्री. खैरे यांनी घेतला. शासनांच्या योजनांचा लाभ
वेळेत देण्यासाठी सर्व यंत्रणांनी विकासकामांना प्राधान्य देऊन जनतेला लाभ मिळून द्यावा,
अशा सूचनाही त्यांनी केल्या.
गंगापूर येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती मिळून कामे
दर्जेदार व्हावीत, यासाठी समितीमार्फत उपविभागीय अधिकारी संदीप सानप, शहर अभियंता
पानझडे यांनी दि. 15 रोजी (सोमवारी) या योजनेची सुरू असलेल्या कामांची पाहणी करून जिल्हाधिकारी
यांना अहवाल सादर करावा, असे निर्देशही श्री. खैरे यांनी दिले.
गुलमंडी, पैठणगेट, औरंगपुरा, शहागंज आदींसह शहरातील प्रमुख अशा
जुन्या हेरिटेज वास्तूंचा विचार होऊन स्मार्ट सिटी योजनेत त्यांचा विशेष अंतर्भाव
असावा. तसा सुधारीत प्रस्ताव शासनाला पाठवावा, असेही श्री. खैरे यांनी यावेळी
सांगितले. भूमिगत गटार योजनाही जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आमदार झांबड, महापौर घोडेले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही यावेळी
अधिका-यांना सूचना करून मार्गदर्शन केले.
****
Comments