दिनांक 23 जानेवारी 2018
औरंगाबाद, दि.23 : आजच्या काळात सायबर सुरक्षा, खबरदारी आणि जनजागृतीची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे वाढलेली सायबर गुन्हेगारी कमी होण्यास त्यामुळे मदतच होणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी आज येथे केले.
औरंगाबाद पोलिस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम परिसरातील आर्यभट्ट सभागृहात माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर गुन्हे आणि जनजागृती अभियानांतर्गत सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमती सिंह बोलत होत्या. पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, आयसीआयसीआय बँकेचे शेखर शिंदे, शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे, सहायक पोलीस आयुक्त श्री.कोडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.सिंह म्हणाल्या, पोलिस यंत्रणा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक मजबूत झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने सजग राहावयास हवे. नागरिकांनी ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार, व्हॉटसअप, फेसबुकसह सोशल मीडियाचा वापर, मोबाईल, संगणक हाताळणी काळजीपूर्वक करायला हवी. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करुन आपली फसवणूक करणार नाहीत, यासाठी सातत्याने दक्ष असायला हवे, असेही सिंह यांनी सांगितले.
श्रीमती धाटे-घाटगे म्हणाल्या, सायबर गुन्ह्यांच्याबाबतीत प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करून होणा-या फसवणुकीबाबत दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी भारत सरकारने डिजीटल इंडियाचे धोरण अवलंबिले आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्र शासनाने डिजीटल महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. नव्या युगात ती सर्वांनाच नांदीच ठरणारी आहे. सामान्यांसाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब या डिजीटल धोरणामुळे अस्तित्त्वात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तरी देखील नवतंत्रज्ञानाचा वापर करताना सुरक्षा महत्त्वाची असून खबरदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्वानुभवातून सांगितले.
मुंबईतील आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक शेखर शिंदे यांनी इंटरनेटचा वाढता वापर, फसवे इमेल, दूरध्वनी, एटीएम कार्डचे क्लोनिंग, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, सोशल मीडियाचा गैरवापर, ई-वॉलेट याबाबत घ्यावयाची काळजी यावर सविस्तर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. त्याचप्रकारे शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे यांनीही मोबाईल, इंटरनेटच्या विविध संकेतस्थळ वापराबाबतची आचारसंहिता आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वापरावयाचे तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनीही मोबाईल, इंटरनेट निष्काळजीपणे वापरामुळे त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तींना होतो. परंतु राज्यात शासनाने प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब स्थापन करून वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणा-या गुन्हेगारीवर आळा घातला आहे. तसेच पोलिस विभाग तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकराज्य अंकांचे पोलिस उपायुक्तांच्याहस्ते प्रकाशन
माध्यम प्रतिनिधींच्या कार्यशाळेत पोलिस प्रशासनावर माहितीपूर्ण असलेला जानेवारी 2018 च्या स्मार्ट, समर्थ, संवेदनशील आपले पोलिस आपली अस्मिता या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, आयसीआयसीआय बँकेचे शेखर शिंदे, शासकीय न्यायवैद्यकीय आणि विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ.चरणसिंग कायटे, सहायक पोलीस आयुक्त श्री.कोडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदींची उपस्थिती होती.
*****
Comments