औरंगाबाद, दि.05-स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक रहावे. शेतमालाच्या विपणनाबरोबरच गुणवत्तेचा ध्यास धरावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
अयोध्या नगरीत आयोजित तीन दिवसीय महाॲग्रो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बागडे बोलत होते. यावेळी पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, मसिआचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष समीर दुधगावकर, मुख्य समन्वयक ॲड. वसंत देशमुख, विजय बोराडे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, नंदलाल काळे, जगन्नाथ पाटील आदींची उपस्थिती होती.
विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, आपला देश दूध उत्पादनात जगात अव्वल आहे. परंतु दूध उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शेती नसलेल्यांकडे दुग्धव्यवसाय हे उत्तम साधन आहे. दुग्ध व्यवसायाचे साधन असलेल्या भागात शेतकरी आत्महत्या कमी प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे. ही आनंदाची बाब आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा यांचे उत्तम उदाहरण यासाठी घेता येईल. दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांना वरदानच असून शेतकऱ्यांनी याकडे वळल्यास आर्थिक समृद्धी येणास मदत होईल.पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांचाही शेतकऱ्यांनी लाभ घेऊन प्रगती साधावी, असेही श्री. बागडे म्हणाले.
पशुसंवर्धन मंत्री जानकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून शेतीला शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न कसोशीने होत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे ठाकलेले आहे. शेतकऱ्यांनीही आजच्या स्पर्धेचा विचार करुन पाल्याला उत्तमप्रकारचे शिक्षण देऊन सनदी अधिकारी बनविण्याचे स्वप्न पाहायलाच हवे.
कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडून उत्तम शेती, समृद्ध शेती होण्यास मदतच होते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायलाच हवा. त्याचबरोबर दूध उत्पादनातून रोजगारही मिळवावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले. खासदार खैरे यांनीही शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे सांगून कृषी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. खासदार दानवे यांनी देखील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शासनाने गटशेतीसाठी 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, असेही श्री. दानवे म्हणाले.
विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेतततळे, गटशेतीच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांचा विकास, संपन्न शेती करण्यावर भर असल्याचेही श्री. भापकर म्हणाले.
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंगल वाघमारे, मधुकर अण्णा छिंद्रे, दीपक पवार, शिवाजी देशमुख, शरद गोरे, चंदशेखर कुलकर्णी, कपीलेश्वर सोनटक्के, विठ्ठल क्षीरसागर, गजानन गावंडे, दत्ता काकडे, महादेव भांगे, नारायण इथ्थर, ज्ञानेश्वर चौधरी, राजाराम महाजन, बाळकृष्ण पाटील, अमृत देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे यांच्याहस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मंडलेचा यांनी केले. सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले आभार श्री. दूधगावकर यांनी मानले.
Comments