पावसाचं अनिश्चित प्रमाण. त्यातच कोरडवाहू शेती. परंतु शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा मागेल त्याला शेततळे योजनेने शेतक-यांत नवचैतन्य आणलं. अन् पाण्यानं स्वयंपूर्ण झालं ते दुधड. इथं प्रत्येक शेतात शेततळं उभारलंय, अशीच स्थिती. त्यामुळं पीक पद्धतीत बदल झाला. नगदी पिकांचा शेतकरी आता विचार करू लागलेत. या गावातील बदलेल्या परिस्थितीबद्दल…
''मराठवाडा विभागाचा विकास करण्याचा ध्यास विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी घेतला आहे. विकासाचा भाग म्हणून प्रत्येक अधिका-यांनी एक गाव दत्तक घ्यावे, असा त्यांनी प्रयोग केला. त्याचाच प्रत्यय म्हणून मागेल त्याला शेततळे योजना दुधड गावात यशस्वी झाली. शेतक-यांनी शक्य तिथे आपल्या शेतात शेततळे घ्यावीत. सरकारच्या पैशातून ते घ्यावयाचे असल्याने या योजनेचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला हवा. दुधडमध्ये यंदा जवळपास 65 शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा. शेततळ्यांची निर्मिती केल्यास गावात जलसमृद्धी अवतरणारच ! ''
- डॉ. विजयकुमार फड,
अप्पर विभागीय आयुक्त, औरंगाबाद
औरंगाबाद
तालुक्यातील दुधड. अवघ्या 25-30 किलोमीटर अंतरावर. लोकसंख्या दोन हजार 661. पूर्वी
ऊस, मोसंबी, कापूस, सोयाबीन, ज्वारी, डाळींब पिके याठिकाणी शेतकरी घेत. परंतु डाळिंबाला
आवश्यक पाणी देणे त्यांना शक्य होत नव्हते. मात्र मागेल त्याला शेततळे योजनेने गावक-यांची
चिंताच मिटवली. रोजगाराच्या नव्या वाटा निर्माण केल्या. दत्तक गावाचा कायापालट मागेल
त्याला शेततळे योजनेतून झाला. योजनेचे यशस्वी मॉडेल म्हणून दुधड गावाकडे पाहायलाच हवे.
मदन चौधरी यांनी शेततळ्याच्या माध्यमातून फुल शेती केली आहे |
पीक पद्धतीत झाला बदल
शासन,
प्रशासन आणि लोकसहभागातून मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ दुधडच्या शेतक-यांनी घेतला.
त्यांच्या शाश्वत उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचा असाच हा निर्णय. यंदा पावसाचे प्रमाण
दुधडमध्ये कमी झाल्याने गावातील लहुकी तलाव कोरडा पडलाय. 30 वर्षांपूर्वी दुधडमध्ये
ऊसाची लागवड जोमात होत. परंतु कालांतराने शेतक-यांनी ऊसाकडून मोसंबीचा मार्ग स्वीकारला. मोसंबीला भाव मिळत नसल्याने दुधडचे शेतकरी डाळिंबाकडे
वळले. काहींनी फुलशेतीचा पर्याय निवडला. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले. परंतु शेतक-यांना
तारलं ते मागेल त्याला शेततळे योजनेने असे येथील शेतकरी सांगतात.
ध्यास विकासाचा…
विभागीय
आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी चला गावाकडे जाऊ ध्यास विकासाचा घेऊ हे अभिनव अभियान
विभागात राबविण्यास सुरूवात केली. यामध्ये दुधड गाव अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार
फड यांनी दत्तक घेतले. त्यानंतर त्यांनी वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, जलयुक्त शिवार,
महिला सबलीकरण, वैयक्तिक शौचालये, मागेल त्याला शेततळे योजनेबाबत गावक-यांना माहिती
दिली. सरपंचांनी स्वत:च्या घरापासून वृक्ष लागवडीस सुरूवात केली. गावक-यांनीही शेततळ्याचे
महत्त्व ओळखून योजनेचा लाभ घेतला.
शेततळ्यांचे महत्त्व, बारामाही पिके
सरपंचांना गावकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची धडपड.
शिवाय स्वत:कडेच आपले सरकार सेवा केंद्र असल्याने त्यांनी प्रत्येक गावकऱ्यांना शेततळ्याचे
महत्त्व पटवून दिले. त्यांचा ऑनलाईन अर्ज भरून दिला, अन् मागेल त्याला शेततळे या शासकीय
योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळं शेतकरी बारामाही पिकांचा विचार करू लागलेत. फुलशेती,
फळबाग लागवडीकडेही ते वळलेत.
शेततळ्यांमध्ये औरंगाबाद विभाग अव्वल
यंदा
या गावामध्ये 65 शेततळी निर्माण झाली. राज्यात औरंगाबाद विभागाने शेततळं निर्मितीत
अव्वल स्थान मिळवलंय. मराठवाडा विभागात 24 ऑक्टोबर अखेर 20 हजार 270 शेततळी पूर्ण झाली.
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 6 हजार 27 शेततळ्यांची निर्मिती झाली. त्यापाठोपाठ
जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि लातूर विभागातील जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
होय, आम्ही लाभार्थी
शेततळ्याचं
50 हजारांचं अनुदान मिळालं. पूर्वी मार्चपर्यंतच शेतीला पाणी पुरत. उन्हाळ्यात शेततळ्यामुळे
शेतातच पाणी राहणार असल्याने इतर पिकांचाही विचार येथील शेतकरी करायला लागलेत. पीक
पद्धतीत बदल झाला आहे. पारंपरिक पिकांकडून आता आधुनिक शेती, उत्पादनांकडे वळलो आहोत,
असे येथील शेतकरी किशोर चौधरी सांगतात.
लाभार्थी बाबासाहेब वानखरे |
शेतकरी बाबासाहेब
वानखरे म्हणतात, माझ्याकडे साडेचार एकर शेती आहे. त्यात आम्ही 25 बाय 25 आणि 32 फूट
खोल असे शेततळे उभारले. आमच्या शेतात दोन विहिरी आहेत. या विहिरीच्या पाण्यातून केवळ 12 दिवसांत शेततळे
तुडुंब भरले आहे. आता तीन एकरामध्ये डाळिंबांची लागवड केली आहे. पूर्वी पिकांसाठी आम्हाला
पाण्याची टंचाई भासत. परंतु आता शेततळ्यांमुळे पाण्याची चिंताच मिटली आहे. शासनाच्या
50 हजार रुपये अनुदानाचाही या शेततळ्यासाठी उपयोग झाला आहे. वार्षिक 15 लाख रूपयांचे
उत्पन्न मी या शेततळ्यामुळे काढू शकतो, असा विश्वासही वानखरे यांना आहे.
लाभार्थी शिवसिंग घुसिंगे |
55 वर्षीय शिवसिंग
फुलसिंग घुसिंगे यांनी सांगितले, की शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून 20 ते
25 लाख रुपयांचे उत्पन्न होण्यास मदत होणार आहे. येथून पुढे आम्हाला शेततळ्याचा कायमस्वरूपी
फायदा होणार आहे. डाळींब लागवडीसाठी ते अत्यंत म्हत्त्वाचेच आहे. आम्ही 25 बाय 25 मीटर
आणि 32 फूट खोल अशा पद्धतीने शेततळे तयार केले आहे.
सरपंच घोडके |
सरपंच कल्याण घोडके म्हणतात, शेततळ्यामुळे गावाच्या विकासाला
सुरूवात झाली. डाळिंब, पपई, फुलशेतीकडे शेतकरी वळला आहे. शासनाच्या 50 हजार रूपये अनुदानाचा
शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. शेतकरी पारंपरिक पिकांकडून आधुनिक शेतीकडे वळल्याने गावाबरोबरच
शेतक-यांचा विकास होण्यास मदत होत असल्याने आनंद वाटतो, असेही घोडके म्हणतात. मागेल
त्याला शेततळे योजनेची माहिती ग्रामसभेतून मिळाल्याचे कृषी मित्र प्रभाकर काकडे सांगतात.
शासनाची योजना मागेल त्याला शेततळे असली तरी गावक-यांच्या निर्धारातून शेत तिथं शेततळे
करण्याचा गावक-यांनी निर्धार केला आहे.
- श्याम टरके,
माहिती केंद्र, औरंगाबाद
मो. क्र.
9860078988
Comments