स्वच्छता समृध्दीसाठी महत्त्वाची.
तशीच आरोग्यदायी जीवनासाठीही. त्यातूनच विकास साधला जातो. मग तो परिसराचा असो वा राज्य,
देशाचा. औरंगाबाद शहरात 42 महत्त्वाचे पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांची शुक्रवार, दि.
6 रोजी सकाळी 6 ते 9 या वेळेत एकाच दिवशी सर्व
शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात येणार
आहे. त्यानिमित्त स्वच्छतेची महती सांगणारा हा विशेष लेख.
तीन वर्षापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात महात्मा गांधी जयंती
दिनापासून स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू
घेऊन स्वच्छता केल्याचेही आपण पाहिलेच आहे. त्या दिवसापासून देशात स्वच्छ भारत अभियानामध्ये
उत्स्फूर्तपणे जनता सहभागी होते आहे. आता या अभियानाने लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त केले
आहे. इतर राज्य सरकारही अभियानात हिरीरीने सहभागी होताहेत. महाराष्ट्र राज्य यात आघाडीवर
आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सरकारच्या नेतृत्त्वाखाली आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली
राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान जोमात सुरू आहे. त्यातून शहरांचा, गावांचा कायापालट
होतो आहे.
शहरीभागाबरोबरच मराठवाड्यातील ग्रामीण
भागानेही स्वच्छतेची कास धरली आहे. संपूर्ण मराठवाडा हगणदारी मुक्तीच्या वाटचाल करतो
आहे. स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम मराठवाड्यात प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. ग्रामीण
भागामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत मराठवाडा हागणदारी मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो
आहे. मराठवाडा विभागामध्ये वैयक्तिक शौचालयाचे काम 24 टक्के झाले होते. मात्र सप्टेंबरपर्यंत
72 टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच 17 लाख वैयक्तिक शौचालये पूर्ण झाली आहेत. अशा दृष्टीने
वाटचाल सुरू असल्याने मराठवाडा हागणदारी मुक्त होऊन स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ मराठवाडा
होणारच यात मात्र शंका नाही. राज्यातील पालघर आणि जालना ही दोन जिल्हे हागणदारी मुक्त
झाल्याचेही श्री. लोणीकर यांनी नुकतेच घोषित केले आहे.
स्वच्छता विकासाचा केंद्रबिंदू आहे. स्वच्छ पर्यावरण, चांगले
आरोग्य मिळावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शहरातील उघड्यावर शौचालयास
जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी, शहरातील घनकचऱ्याचे
व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येते आहे. उघड्यावरील शौचविधी
बंद करणे, हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांना या कामातून मुक्त करणे, नागरी घनकचरा
व्यवस्थापनासाठी आधुनिक, शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करणे, स्वच्छतेच्या चांगल्या पध्दतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये
बदल करणे, स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड
घालणे आदी अभियानाचे उद्देश आहेत. त्यादृष्टीने शासनामार्फत कार्यवाही पार पाडल्या
जाते आहे.
शहरे स्वच्छ व्हावीत. लोकांना स्वच्छतेची सवय लागावी, त्यातच
औरंगाबाद पर्यटनाची राजधानी. दि. 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन विभागाकडून ‘पर्यटन पर्व’ हा कार्यक्रमही राबविण्यास सुरूवात
झाली आहे. म्हणून पर्यटनस्थळे, महत्त्वाची ठिकाणे यांची स्वच्छता व्हावी. यातून पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने विभागीय आयुक्त
डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या नेतृत्त्वात औरंगाबादेतील सर्व प्रमुख शासकीय कार्यालये
दि. 6 ऑक्टोबर रोजी शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवित आहेत. यामध्ये स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी,
शालेय विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. भापकर यांनी केले
आहे.
स्वच्छता अभियान केवळ अभियान नसून लोकचळवळ आहे. स्वच्छता
करणे म्हणजे दुय्यम दर्जाचे काम नाही. तर महत्त्वाचे कार्य आहे. त्यातून समाजोन्नती,
राष्ट्रोन्नतीचे कार्य होण्यास मदत होते. स्वच्छता करणे केवळ एखाद्या विभागाचे कार्य
नाही. स्वच्छता ठेवणे, राखणे ही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येकाने या
राष्ट्रीय कार्यात मोलाचा सहभाग घ्यायलाच हवा. सहभागी होऊन औरंगाबादच्या पर्यटन नगरीला
चकाचक करण्याचा ध्यास घ्यायला हवा. त्यामुळे पर्यटनस्थळांचे संवर्धन, रोजगारनिर्मिती
होऊन पर्यटन व्यवसायालाही चालना मिळण्यास मदतच होईल. स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने सेवा,
राष्ट्रभक्ती असल्याने प्रत्येकाने यात सामील व्हायलाच हवे. तसेच इतरांनाही याबाबत
सांगून सहभागी करायला हवेच.
- श्याम टरके, औरंगाबाद
Comments