प्राचीन काळापासून वैविधतेने नटलेले औरंगाबाद. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. या राजधानीत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 27 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे यंदाचे ‘विकासाचे साधन शाश्वत पर्यटन’ असे घोषवाक्य आहे. या दिनानिमित्त औरंगाबाद पर्यटन राजधानीचा घेतलेला हा विकासात्मक आढावा.
आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे 52 दरवाजांचे शहर म्हणूनही औरंगाबादची ओळख आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तूकलेचा, शिल्पकलेचा वारसा, विविध प्रकारच्या वन, वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद.
युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेली अजिंठा लेणी, यादव आणि मुघल काळातील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला, मिनी ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बिबी का मकबरा म्हणजे औरंगाबादसाठी भूषणच. औरंगाबादची विकासाची मुहुर्तमेढ रोवणारा मलिक अंबरचा सोनेरी महल, पाण्याच्या नियोजनासाठी बांधलेल्या नहरींचा उत्तम नमुना असलेली पानचक्की, शहराच्या डोंगरमाथ्यावरील बौद्ध लेण्या, निसर्गरम्य परिसरात वसलेले आणि शैक्षणिक चळवळीचे महत्त्वाचे स्थान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी एक ना अनेक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे. एकाहून एक सरस पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत भारतातील जागतिक दर्जाची ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांसाठी औरंगाबाद हेरिटेज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, जनजागृती मोहीम राबवून संवर्धनासाठी पुढाकारही घेतला जातो. यामध्ये सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचबरोबर संवर्धनासाठीही मोलाची अशीच बाब आहे.
महामंडळाबरोबरच महापालिकेतर्फेही शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचा अटोकाट प्रयत्न असतो. खुलताबादमध्ये ऐतिहासिक असलेल्या नगारखाना दरवाजाचे महामंडळामार्फत सुशोभीकरण झाल्याने खुलताबादमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीलाही समाधान वाटते. या नगारखाना दरवाजामुुळे खुलताबादच्या सौंदर्यीकरणात मोलाची अशी भर पडली आहे.
पर्यटन वाढीसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो तो पर्यटक. म्हणूनच ‘अतिथी देवो भव’ या भारतीय संस्कृतीला अनुसरुन पर्यटकांना योग्य माहिती मिळावी, त्यांची गैरसोय होऊ नये, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन ठिकठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच औरंगाबाद-वेरुळ, औरंगाबाद-अजिंठा रस्त्यांवर माहिती फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सिल्लोड येथील महामंडळाच्या मार्गस्थ सेवा केंद्राचे नूतनीकरण करुन पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयाच्या संकेतस्थळावर पर्यटकांसाठी सुविधा, सवलतींची माहिती दिलेली आहे.
52 दरवाजांचे शहर, खडकी, फतेहपूर अशी औरंगाबादची जुनी नावे. परंतु आता औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात पर्यटनाचा झपाट्याने विकास आणि संवर्धन होतो आहे. तसेच ती आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यटनस्थळांच्या संवर्धनासह त्यांची स्वच्छता राखण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे आपण मनोमन ठरवणे; आजच्या जागतिक पर्यटनदिनी औचित्याचे ठरेल, तेही तितकेच महत्त्वाचे.
-श्याम टरके, औरंगाबाद
Comments