पर्यटन व्यवसायात ‘गाईड’ होण्याची सुवर्णसंधी
टुरिस्ट गाईड व्यवसायात येण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मुंबई, नागपूर, औरंगाबाद व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 400 युवकांना उपलब्ध करून दिली आहे. दि. 10.09.2017 पर्यंतhttp://mtdc.mhpravesh.in या संकेत स्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे. या व्यवसायावर प्रकाश टाकणारा हा लेख
औरंगाबाद 52 दरवाजांचे शहर. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त असं औरंगाबाद. अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी – का- मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला आदींमुळे देशी-विदेशी पर्यटक औरंगाबादेत दाखल होतात. इथल्या वास्तूकलांचा, इतिहासाचा अभ्यास करतात. संशोधन करतात. परंतु या सर्वांमध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावतात ते गाईड.
‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती. या संस्कृतीच्या प्रतिमा निर्मितीचे महत्त्वपूर्ण असं कार्य ‘गाईड’ ला पार पाडावे लागते. पर्यटकांचा मित्र म्हणून आतिथ्यशील वर्तनाने त्यांना मदत करावी लागते. आपल्या नैतिक जबाबदाऱ्यांसह पर्यटकांचा विश्वास संपादन करावा लागतो. गाइडच्या अंगी सौजन्यपूर्ण, सक्षम, चतूर, दयावन, क्षमाशील, समंजस असे गुणही असणे महत्वाचे असते. यातूनच आदरातिथ्याचे दर्शन घडते. त्याचबरोबर राज्य, देशातील घडामोडींवर बारकाईने, अचूक लक्ष ठेवून पर्यटकांना नवनवीन माहिती देणे आवश्यक असते. इथल्या संस्कृती, परंपरा, लहेजा, सवयी समजून इतरांपर्यत सकारात्मक पैलू पोहचवावे लागतात. त्यामुळे स्थानिक – पर्यटकांमध्ये आदरभाव निर्माण होण्यास मदत होते. वेळेच पालन, टापटीप राहणी, प्रामाणिकपणा, प्रसन्न वेशभूषा, सुसंस्कृत वर्तणूक, शांत स्वभाव कामाप्रती निष्ठा, असणेही गाईडसाठी अन् राज्य- देशासाठी महत्त्वाचे आहे. या निष्ठेतूनच देशाची प्रतिमा उंचावली, साकारली जाते. पर्यटक, आपला ग्राहक आहे. ग्राहक नेहमीच बरोबर असतो हे सूत्र मनात ठेवून त्यांच्याशी सौजन्याने वागावे. त्यांचा प्रवास समाधानकारक होण्यामध्ये गाईडची भूमिका मोलाचीच असते. पर्यटकांसाठी गाईडचे थेट संबंध येत असल्याने राज्य, देशाची प्रतिमा उंचावण्याचं कार्य जबाबदारीने ‘गाईड’ ला पार पाडावे लागते.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराची उत्तम संधी म्हणूनही याकडे पाहता येईल. तसेच शहरे, पर्यटनस्थळी पूर्ण वेळ काम, पर्यटन क्षेत्रातल्या संस्थांकडे रोजगाराची संधीही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
गाईड होण्यासाठी 18 ते 60 वयोगाटातील स्थानिक रहिवासी असायला हवा. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर आणि अमरावतीतील रहिवाशांकरता पदवी, पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शहरांव्यतिरिक्त प्रशिक्षणासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विदेशी भाषेचे ज्ञान असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र, यासाठी साक्षांकित प्रती सादर कराव्या लागतात. शारीरिकदृष्ट्या सक्षम, इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाबाबत अत्यंत उत्साही असल्यासच या व्यवसायाकडे वळणे मात्र उत्तम राहील.
पर्यटकांसोबत उत्तम संवाद साधण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे. प्रशिक्षण कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर महामंडळामार्फत नेमलेल्या संस्थेकडून शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर टुरिस्ट गाईड प्रमाणपत्र दिले जाते. जे की पाच वर्षांसाठी वैध असते. त्यानंतर प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात येण्याअगोदर गाईडला रिफ्रेशर कोर्स पूर्ण केल्यानंतरच वैधता वाढवून दिल्या जाते.
अशाप्रकारे ‘ टुरिस्ट गाईड’ व्यवसायात पर्यटकांची सेवा आणि समाधानातून रोजगारप्राप्ती करता येते. त्यामुळे इच्छुकांनी या व्यवसायाकडे संधी म्हणून बघितल्यास पर्यटन व्यवसायात वाढ होण्यास मदतच होईल.
Comments