आम्ही उच्च प्राथमिक शाळेत आल्याचं कळत होतं, तेव्हा गोविंदा, मिथुन,देवानंद, सनी, आदित्य पंचाली, अमरीश पुरी, डायनी, अजय देवगण, अमिताभ, करिश्मा, माधुरी, दिव्या भारती, काजोल अशी नावे कळायला लागली. त्याचबरोबर शहरातील महावीर, रघुवीर, नाझ, फिरोज, तलरेजा, अनुसया चित्रपट गृह आणि दोनेक व्हीडिओ पार्लर.
http://www.universalstudioshollywood.com |
पिचर आवडायचा. हो आम्ही लहानपणी पिचरच म्हणत. चित्रपट सुरु झाला, की फिचर फिल्म असं नाव यायचं. म्हणून आम्ही मित्र यावर वादही घालत. पोस्टर्सवरही तेच लिहिल्याचे आम्हाला ठाम माहीत; तरीही आम्ही या फिचरचा अपभ्रंश करून पिचर हा शब्दच वापरत. जो आमच्या बोलीत रूढ झाला, आजही आहे. पिचरला घरातल्यांचा विरोध. पिचर पाहणे म्हणजे निव्वळ वेळ, पैसा आणि प्रतिष्ठा वाया घालवणे असा आमच्याकडे ठाम समज. त्यामुळे लहानपणापासून आवड असूनही या क्षेत्रात अधिक रस घेता आला नाही.
गांधी विद्यालय शाळा (मढी) आणि त्यातील शिक्षण याबाबत सांगायचे तर आमच्यासाठी असा दंडक,की एखादा दिवस शाळा बुडाली म्हणजे जणू काही महाप्रलय, भूकंप अशी काहीतरी मोठी आपत्ती आमच्यावरच कोसळत. शाळेत कधीतरी म्हणजे मला आठवतंय दहा वर्षात केवळ दोन चित्रपट आम्हाला शाळेतर्फे दाखवले. एक जुरासिक पार्क आणि दुसरा अस्मान से गिरा और खजूर मे अटका…एक अनुसया आणि दुसरा महावीर चित्रपट गृहात. घरातून चित्रपट पाहण्यासाठी कायम विरोध असल्याने ते चित्रपट पहिल्या स्टेजला आम्ही गांभीर्याने पाहिलेही नाहीत. पण जसजसा काळ पुढे सरकत होता. म्हणजे आम्ही उच्च प्राथमिक शाळेत आल्याचं कळत होतं, तेव्हा गोविंदा, मिथुन,देवानंद, सनी, आदित्य पंचाली, अमरीश पुरी, डायनी, अजय देवगण,अमिताभ,करिश्मा,माधुरी,दि व्या भारती, काजोल अशी नावे कळायला लागली. त्याचबरोबर शहरातील महावीर, रघुवीर, नाझ, फिरोज, तलरेजा,अनुसया चित्रपट गृह आणि दोनेक व्हीडिओ पार्लर. कारण चित्रपट पाहण्यासाठी शाळा आणि आमच्या राहत्या घराच्या परिसरात मुबलक अशी सोय. म्हणजे शाळा,घर आणि चित्रपटगृह अगदी जवळच. शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवण आटोपून अर्ध्या तासात या चित्रपटगृह आणि व्हीडिओ पार्लरमधील चित्रपटांची पोस्टर्स आम्ही पाहत. थोडक्यात हमखास फेरफटका मारतच.
आमचे सातव्या इयतेतील क्लास टीचर खनपटे सर. अत्यंत साधी राहणी. ऍटलस सायकलवरच ते शाळेत शहराच्या जवळच असलेल्या वांगीहून येत.शिस्तबद्ध असा त्यांचा कार्यक्रम असायचा. पांढरे शुभ्र असे त्यांचे वस्त्र, गळ्यात इटकरी रंगाची मफलर. गणित शिकवत ते आम्हाला. खूपच मन लावून शिकवायचे. त्यांची तळमळ बहुदा आताच्या शिक्षकांत अपवादात्मक परिस्थितीत पाहावयास मिळेल. ते क्लास टीचर असल्याने ते आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवत.
एकदाचा प्रसंग असा, दुपारच्या इंटरवलमध्ये आम्ही शाळेतून घरी आलोत. भूक नसल्याचं घरी सांगून बाहेर पडलोत. मी व माझा एक मित्र व्हीडिओकडे गेलोत. सनी देवलचा कोणतातरी चित्रपट लागला होता. आम्हाला चित्रपटगृहांपेक्षा व्हीडिओ पार्लरच अधिक आवडत. त्याची कारणे म्हणजे दररोज नवीन चित्रपट, नवे पोस्टर्स, शिवाय केवळ एक-दोन रुपयात चित्रपट पाहणे होत. मध्यंतरात दोन रुपये खर्च झाला, की तीन ते चार रुपयांत तीन तासांचा चित्रपट. फुल्ल एन्जॉय. आता मी व माझा मित्र व्हीडिओच्या बाहेर लावण्यात येणारे पोस्टर्स पाहत होतोत. मी सनी देओलच्या कामगिरीचे अर्थात तो कसा फायटिंग खेळतो. डाकूला कसा मारतो. हिरो आणि डाकू अशीच पिचरची आमची धारणा असायची. हिरोईन कोण आहे असा एक तत्कालीन प्रेक्षक या नात्याने मित्राला पीचरबाबत सांगत होतो. माझे सांगून झाले. मागे वळून दुसऱ्या व्हीडिओकडे आम्ही निघणार तोच आमच्यामागे आमची चर्चा ऐकत होते ते आमचे खनपटे सर.
आम्ही त्यांच्याकडे पाहिले अन् त्यांनी आमच्याकडे. मग आमचे हातपाय लटपटायला लागली. सर...आम्ही इकडे बाजारात निघालोत...घरी थोडी भाजी न्यायचीय...असं घाबरत घाबरत सांगितलं. सरांपासून सुटका झाली. मग आनंदात उड्या मारत पुढचा व्हीडिओ गाठला. अगदी फिरोजच्या बाजूला असलेला वरुण व्हीडिओ. अत्यंत बसण्याची व व्यवस्थापनाशी साजेशी रचना होती, या ठिकाणी. बाहेरच खुदा गवाह या अमिताभच्या पीचरचे पोस्टर्स लागलेले होते. ते पाहिले, चर्चा झाली. फिरोज तर कधी बंद तर कधी चालू राहत. त्यावेळीही बंदच होती. पुढे आम्ही महावीर टॉकीजमध्ये गेलोत. तिथलीही पोस्टर्स पाहिली, चर्चा झाली. रघुवीरची पोस्टर्स आमच्या बालमनावर परिणाम करणारी असल्याने आम्ही तिकडे जातच नव्हतो. आता आमचा शेवटचा टप्पा होता नाज टॉकीजचा. तेवढं झालं, की आम्ही शाळेत जाणार, हे नक्की. पण इथं आम्ही पोस्टर्स पाहत होतो. पाहणं झालीही. पण पुन्हा आमच्या मागे उभे होते, ते खनपटे सर. आता तर त्यांनी आमच्या खांद्यावर हातही ठेवला होता.त्यामुळे सुटका झालीच नव्हती कारण सर आमच्या मागावरच होते. त्यांनी असं म्हटलं नाही की तुम्ही पीचर पाहू नका, पण ते एक शब्दही बोलले नाहीत. मात्र त्यांच्या डोळ्यातून आम्हाला बरंच काही कळत होतं. त्यांना राग आला होता. त्यांनी एवढंच विचारलं कुठेय भाजी...मला माझी चूक कळली होती...मी शरमेने मान खाली घातली. पुन्हा सरांकडे पाहिले नाही. गुमान तिथून निघालोत.
सर आता वर्गात काहीतरी म्हणतील,अशी भीती महिनाभर मनात होती. परंतु सर काहीच म्हणाले नाहीत. मग मीच माझ्या मनाशी चित्रपट न पाहण्याचं ठरवलं होतं. पण आवड असूनही या क्षेत्रात रस घेता आला नाही. कधी कधी ते उत्तम झाल्यासारखं वाटतं. कारण या क्षेत्रात, उद्योग समुहात आज काम करत असलेल्या माझ्या कष्टाळू मित्रांकडे, त्यांच्या जिद्दीकडे आणि ग्लॅमरच्या दुनियेकडे बारकाईने पाहिले, की समजते. इथं काम करणं सोपं नाही. शिवाय आर्थिक पाठिंबा, दीर्घ सहनशक्ती, कल्पकताही हवीच. लेट नाईट पार्ट्यांना उपस्थिती. चेहऱ्यावर कायम हास्य, संस्कारांना तिलांजली, ही पथ्येही इथे पाळावी लागतात.
बालपणी माझ्यासोबत राहणाऱ्या त्या मित्राला पिचरचे खूपच वेड. तसेच त्याच्या वडिलांनाही. म्हणून त्यांनी तर एका टॉकीजमध्येच नोकरी पत्करली. आता त्या टॉकीजमध्ये एकही चित्रपट दाखवल्या जात नाही. किंबहुना त्यावेळीही या चांगल्या, सुसंस्कारित म्हटल्या जाणा-या परिसरात देवाचे नाव असलेल्या टॉकीजमध्ये काही राम उरलेले नव्हते. मात्र एकदा या मित्राने मला ती टॉकीजही आग्रहाने दाखविली. मी बघितली. त्याच्या वडिलांनाही भेटलो. त्याचे वडील खूपच फॉरवर्ड विचाराचे असल्याने त्यांनी आम्हाला पीचर पाहायचा तर पहा, अशी मोकळीक दिली. पण असा चित्रपट ते ही बाल वयात पाहणं म्हणजे महापापच,अथवा मोठा अनर्थच, असं आमच्या मनावर कोरलेलं. त्यामुळे केवळ ती टॉकीज पाहिली. तेथील पोस्टर्स आणि पीचरही पाहिला नाही. हाच काय तो आमच्यावर झालेला रूढी, परंपरा किंवा संस्काराचा पगडा म्हणा. किंबहुना आताचे जनरेशन 5 जीच्या स्पीडने पुढे डाउनलोड होत आहे. त्यांनी पीचरला जावे, डाऊनलोड करावे परंतु त्यांनी संस्काराची जपणूक, आई-वडिलांची तळमळ याकडे देखील उघड्या डोळ्याने पाहावे. आई-वडिलांची स्वप्नं आणि आपली कृती यात ताळमेळ बसतोय का याचा विचार तरूणाईने केल्यास अनेक श्रावण बाळ तयार होतील. किंबहुना त्या आई-वडिलांना तुमच्या कर्तत्त्वावर गर्व राहील. त्यांचा आनंद काही औरच असेल.
पूर्वीच्या तुलनेत आताचे चित्रपट पाहिले,की जुने ते सोनेच असं म्हणावसं वाटतं. आताच्या चित्रपटात आधुनिक तंत्र वापरल्या जातं. तेवढाच काय तो अपवाद आणि बलस्थान. पिचरच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य या प्रचंड खर्चिक अशा माध्यमातून होते. पण ते अलीकडे होताना दिसत नाही. केवळ आणि केवळ मनोरंजन. धांगडधिंगा हेच काय ते वैशिष्ट्य. सुदैवाने मला तीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाहता आले. जवळून अनुभवता आले. प्रसिद्ध देशी-परदेशी नट-नट्यांना भेटता आले. संवाद साधता आला. काहींचे या सिनेजगताशी असलेले नाते, प्रामाणिकपणा अनुभवता आला. त्याचे वार्तांकन करता आले. हे सांगणे याचा अर्थ मोठेपणा अथवा अहंभाव मुळीच नाही तर हे केवळ माझ्या शिक्षकांच्या, माझ्या क्षेत्रातील गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच.
देशी-विदेशी सिनेमांची अर्थात पिचरची काही प्रमाणात भूक भागली. अजून भागवायचीय. पूर्वी केवळ चार रुपयांत पाहता येणारा पीचर मात्र आता बदलत्या मल्टिप्लेक्समुळे हजाराच्या घरात गेलाय. पण पुन्हा एकदा या चित्रपट आणि परिस्थितीबाबत सर्वार्थाने म्हणावेसे वाटतेय, जुने ते सोनेच.
-श्याम टरके
ई-मेल- श्यामटरके@डेटामेल.भारत
ई-मेल- श्यामटरके@डेटामेल.भारत
Comments