वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’
विदर्भातील वाघांच्या सर्वाधिक अधिवासामुळे नागपूर हे टायगर कॅपिटल म्हणून प्रकाशझोतात आले आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्पामुळे जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन याठिकाणी आपणाला घडते. पट्टेदार वाघ, हरिण, साळिंदर, नीलगाय, अस्वल, मोर आदी प्रकारचे वन्यप्राणी पर्यटकांना वारंवार येण्यासाठी खुणावतात. त्यांचे व वनाचे उत्तम संवर्धन म्हणजे आपल्यासाठी पेंच प्रकल्प अमूल्य असा ठेवाच म्हणावे लागेल. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी भेट द्यावीच, असाच हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प होय.
येथील डिसेंबर महिन्यातली गुलाबी थंडी आणि आजूबाजूचे पर्यटन पर्यटकांना भूरळ घालतातच. राज्यातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या नागपूर-अमरावती विभागात आहेत. महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न, पर्यावरणप्रेमी संघटनांची साथ आणि सेलिब्रिटींचा सहभाग यामुळे वन्यजीवांचे संवर्धन होत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघांचा अधिवास नागपूर-अमरावती विभागात आहे. त्यातही सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांइतकीच संख्या पेंच-सिल्लारी व्याघ्र प्रकल्पात आहे. नागपूरपासून अवघ्या 80 किमी असलेल्या या प्रकल्पात 257 चौ. किमी असलेले राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. जैवविविधतेने नटलेले विलोभनीय हिरवेगार डोंगर, तळे, दऱ्या-खोऱ्यातून वाहणारे पाणी, 33 प्रकारच्या सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 164 प्रजातींचे विविध पक्षी, 50 हून अधिक प्रकारचे मासे, 10 प्रकारचे भू जलचर, 30 प्रजातींचे सरपटणारे प्राणी या राष्ट्रीय उद्यानात आहेत. विशेष म्हणजे निसर्ग सौंदर्य लाभलेले 24 पट्टेदार वाघही याच भागात अधिवास करतात.
वाघांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर वाघ ज्या भागात राहतात तेथील पर्यावरण उत्कृष्ट दर्जाचे मानले जाते. वाघ जैविक अन्नसाखळीतील प्रमुख घटक आहे. तृणभक्षी प्राण्यांची शिकार व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य वाघच करतात. त्यामुळे पेंच-सिल्लारी पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण आहे. येथील वाघांचे दर्शन व्हावे. त्यांची प्रतिमा, छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपता यावी यासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात. मुक्काम करतात. काहींना पहिल्याच भेटीत येथील ‘वीरप्पन’, ‘प्रिन्स’ यांची छबी टिपता येते. तर काहींना थोडासा वेळ लागतो. परंतू इथे येऊन वाघांचे दर्शन झाल्यास अधिक आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळतो. तरीही इथला निसर्ग पर्यटकांना निराश न करता आपल्यातील विविध प्रजातींच्या वृक्ष, प्राण्यांनी पर्यटकांना या ठिकाणी येण्यासाठी पुन्हा-पुन्हा खुणावतो.
पर्यटकांना याठिकाणी विशेषत: सांबर, हरिण, चितळ, नीलगाय, माकडे, कोल्हा, जंगली कुत्रे-डुकरे, अस्वल, बिबट्या, साळिंदर पाहावयास मिळतात. त्याचबरोबर स्थलांतरित पक्षी, त्यामध्येही विविध प्रजाती याठिकाणी आढळतात. वृक्षांमध्ये बांबू गवत, साग, विविध बहुउपयोगी औषधी वनस्पती या ठिकाणी दिसतात. तर यामध्ये विशेष करुन उल्लेख करावा लागेल तो कऊच्या झाडांचा. दिसायला अतिशय सुंदर असणारे हे वृक्ष प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतेच. या सुंदर अशा वृक्षाला ‘घोस्ट ट्री’ असे इंग्रजीत संबोधतात. तर काहीजण त्याला ‘नेकेड ट्री’ असेही म्हणतात. या वृक्षामुळे जंगलातील सौंदर्यात मोलाची भर पडलेली आपणाला जाणवते. जणू हे वृक्ष प्रत्येकाचे आकर्षण आहेच, हे पर्यटकांच्या आकर्षणावरून लक्षात येते.
बखारी, सलामा, भूकंप रोड आदी ठिकाणांमध्ये ते पाहावयास मिळते. त्यानंतर बांबू वनातून सिल्लारी गेटकडे गेल्यानंतर शेवटच्या भागाला राज्यातील महत्त्वाचा असा जलसंपदा विभागाचा पेंच जलविद्युत प्रकल्प, तोतलाडोह पाहायलाच हवा. हे धरण 74.5 मीटर उंचीचे आहे. त्याची लांबी 680 मीटर आहे. 4273 चौ. किमी पाणलोट क्षेत्र असलेल्या या प्रकल्पातून 1532 द.ल.घ.मी. पाण्याची वार्षिक 40.5 कोटी युनिट निर्मिती होते. तर जलसंचयाच्या 1241 द.ल.घ.मी. पाणी वापरण्या योग्य असते, हे या प्रकल्पाला भेट दिल्यास समजते.
जंगलात सफारी करण्यासाठी स्थानिक जिप्सी वाहन, योग्य व अचूक माहिती देण्यासाठी नाममात्र मानधनावर गाईडही याठिकाणी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रती मानसी 90 रुपये प्रवेशशुल्क सिल्लारी येथे आगमन झाल्यास वन विभागाच्या तिकीट खिडकीवर भरावे लागते. राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळामार्फत खोल्यांची व्यवस्था आहे. सिल्लारी विश्रामगृहासाठी नागपूर विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाशी (0712-2524624) संपर्क साधता येतो.
पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान जैवविविधता, निसर्गसौंदर्याचा अतिशय सुंदर मिलाप असलेल्या वन आणि वन्यजीव संवर्धनाचा अमूल्य असा ठेवाच आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी याठिकाणी भेट द्यायलाच हवी.
- श्याम टरके, नागपूर
Comments