जलयुक्त शिवार एक समृद्ध गाव असतं....
मध्य भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर आयोजि
त करण्यात आले आहे. ॲग्रो व्हिजन असे या प्रदर्शनाचे नाव. शेतक-यांना नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरण्यास उद्युक्त करून शेतीत आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाची भर पाडणारे हे कृषी प्रदर्शन. याठिकाणी 250 हून अधिक शेतीशी संबंधित दालने आहेत. दालनात शेती, शेतीपूरक उद्योग, बी-बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान, अर्थसाहाय्य करणा-या वित्तीय संस्था, शेती उपयोगी वाहने, मसालेदार, चटपट अशा घरगुती उपयोगी वस्तू, खाद्यान्नाचे 23 हून अधिक बचत गटांचे स्टॉल्स यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, पर्यटन, कृषी मंडळे, विविध राज्यातून आलेले कृषीविषयक स्टॉल्स, देशातील कृषीशी संबंधित महत्त्वपूर्ण अशी विविध मंडळे, संस्था यांची दालने येथील शेतक-यांच्या ज्ञानात मोलाची भर घालत आहेत. त्यातच शेतक-यांना त्यांच्या प्रयोगात्मक शेतीसाठी तज्ञांचे मार्गदर्शनही या प्रदर्शन व कार्यशाळेत आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही सर्वात अधिक महत्त्वाचे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे दालन म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानाचे.
प्रदर्शनाच्या सुरूवातीलाच असलेले जलसंधारण व कृषी विभागाच्या या दालनामध्ये अविकसीत पाणलोट या गावाचा नमुना दाखविण्यात आलेला आहे. त्याच्याबाजूलाच सुनियोजनातून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून हिरवा कंच असा डोंगर आणि या डोंगरावर वसलेल्या जलयुक्त गावात पाण्याच्या योग्य नियोजनाने घडवून आणलेला बदल हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ओसाड आणि नियोजनशुन्य पाणी व्यवस्थापनाच्या डोंगराच्या बाजूलाच या डोंगरावर नियोजन केल्यास जलयुक्त शिवार अभियानाचा हेतू आणि लोककल्याण हे पाहावयास मिळते. त्यावर माथा ते पायथा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियानातून या जलयुक्त गावाचा कायापालट या ठिकाणी दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये डीपी सिसीटी, गॅबियन स्ट्रक्चर, ढाळीची बांधबंदिस्ती, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, शेततळे, पॅडी बंडिंग, ठिबक, तुषार सिंचन, फुलशेती, मुक्त गोठा या ठिकाणी दाखविण्यात आलेले आहे. तसेच कृषीपंप, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे विहिरींना प्राप्त होणारे भरपूर पाणी, प्रोत्साहन देऊन करण्यात आलेली वृक्ष लागवड, अभियानात लोकसहभागाचे महत्त्व याठिकाणी “जलयुक्त गाव” मॉडेलच्या माध्यमातून शेतक-यांना उत्तमरित्या समजावून सांगण्यात येते आहे.
राज्यातील 6,202 गावे या अभियानांतर्गत निवडण्यात आलेली असून विदर्भात 2473 गावे निवडण्यात आलेली आहेत. त्यामध्ये राज्यात 1 लाख 24 हजार 584 आणि विदर्भातील 35 हजार 500 कामे पूर्ण झाली आहेत. 3920 सिमेंट नाला बांधांची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसहभागातून 246 कोटींची कामे पूर्ण झालेली आहेत. या अभियानाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन होऊन शेतीचा शाश्वत विकास होण्यास मदत झाली आहे. अभियानातून राज्यात 6.11 लाख हेक्टर सिंचन क्षमतेची निर्मिती झाली असून त्यात विदर्भातील 1.11 लाख हेक्टरचा समावेश असल्याचा या दालनावर सर्वांना माहिती देत असलेले काटोलचे मंडळ कृषी अधिकारी व्ही.ए. भांडवलकर, नागपूरचे कृषी सहायक एम.बी. गजभिये यांनी सांगितले.
निश्चितच शेतक-यांसाठी जलयुक्त शिवार अभियान आता महत्त्वाची योजना झालेली असून या योजनेत शेतक-यांचा सहभागही मोठ्याप्रमाणात वाढत आहे. शेतक-यांना त्याचा फायदा होत असून सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत होते आहे. गावातले पाणी गावात आडवल्याने त्याचा उपयोग गावासह शेतक-यांना शेतीसाठी मोठ्याप्रमाणात होतो आहे. याबाबत आपणाला नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या विभागामार्फत लावण्यात आलेल्या दालनातून हे स्पष्ट जाणवते. या दालनात काटोल तालुक्यातील गोंडी दिग्रसमध्ये 144 टीसीएम पाणी थांबले यावरून स्पष्ट होते आहे. आजही याठिकाणी जून पासून किमान 3 कि.मी पाणी थांबले आहे.
आजूबाजूच्या 300 विहिरींना त्याचा लाभ झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता एस.पी. वाघमारे, उपविभागीय अभियंता टी.डी. पारधी हे प्रदर्शनात येणा-या प्रत्येक शेतक-यांना समजावून सांगताना दिसतात. एकूणच प्रदर्शनामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा स्टॉल्सवरील मॉडेल पाहण्यास शेतक-यांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असून यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे ते सांगतात. तसेच विविध शंकेचे निरसनही येथील मॉडेलच्या माध्यमातून ते करून घेतात. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीला आवश्यक आणि सुनियोजित पाणी दिल्यास पाण्याचा योग्य वापर होऊन शेतीही सुजलाम सुफलाम होईल,असा विश्वास शेतक-यांना आल्याचे याठिकाणी पाहावयास मिळतो. या प्रदर्शनातून काही शेतकरी आदर्श मॉडेल उभे करतील, अशी अपेक्षाही आहे. - श्याम टरके, नागपूर
Comments