सौजन्य-http://images.jagran.com |
गडचिरोली
पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. सर्वांना ते मुखपाठ आहे. परंतु आज सर्वपितृमोक्ष अमावस्या असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. कारणही तसंच आहे. सकाळी सकाळी वृत्तमानपत्रे हाती पडलीे आणि कळलं. पहिल्या पानावर उद्याचा अंक नाही. असं ठळकपणे सर्व वृत्तपत्राच्या अगदी सुरवातीला पाहिल्या कॉलममध्ये वाचकांसाठी सूचना होती. तसं इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही पक्ष पंधरवाडयामुळे पक्षापक्षांचा मिलाप होत नाहीय. पिंडेला कावळा शिवत नाहीय, असं पाहायला, वाचायला मिळालं. त्यामुळे अमावस्याची धास्तीच मनात भरलेली. त्यातच जिल्ह्यात प्रशासनाला कलेक्टरांनी सुटी घोषित केलेली (आम्ही कामावर हजर होतो हं.. कलेक्टर साहेबांसह, कदाचित निवडणुकीमुळे म्हणा).प्रशासनलाही पिढयान् पिढ्या चालत आलेला आदेश घोषित करावा लागतो (अन्यथा कर्मचा-यांच्या क्रयशीलतेवर परिणाम होण्याची शक्यता असते). माध्यमंही त्याच पठडीतली म्हणायला का हरकत आहे. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजसेवेसाठी पत्रकारिता केली. लोकांना शिक्षित केले. चुकलेल्यांना वाट दाखवली. त्या काळातील परिस्थिती वेगळी असली तरी आपण निश्चयाने लोकांपर्यंत विज्ञानवादी विचार पोहचवू शकतोत. मात्र, जिसकी लाठी उसकी भैस...अशी परिस्थिती असल्यामुळे समाजाचा प्रतिबिंब जशास तसे उतरविण्यास धडपडत असलेल्या पत्रकारांवरही निर्बंध्ा येतात. आणल्या जातात. त्यांच्या मनात असूनही त्यांना मनाजोगे करता येत नाही. सर्वांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम पत्रकार करतात परंतु त्यांच्या समस्यांसाठी खंबीरपणे पुढे येणारे काहीच जण आहेत. परंतु त्यांनाही मर्यादा आहेत. त्यांच्यासमोरही विविध प्रश्न आहेत. त्यामुळे सर्वच समस्या सुटल्या जातील, अशी स्िथती सध्या तरी नाही. मात्र अशक्यही नाही. ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख सरांसारखे क्वचितच पत्रकार सापडतील. अन् तशीही पत्रकारिता क्षेत्रात सुटी मिळणं अवघडच. त्यामुळं आमावस्या काय अन् धुळवड काय.... असा दिवस म्हणजेच आपल्याला बोनस मिळाल्याचाच आनंद चेह-यावर पाहावयास मिळतो, एवढे मात्र नक्की.
पितृमोक्ष अमावस्यामुळे युती, आघाडी नाही. कोणतेही काम करायचे नाही. सोने खरेदी करायचे नाही. पूर्वजांना साजूक तुपाचा नैवैद्य दाखवयाचा. (जिवंतपणी त्यांना विचारतही नाहीत).सरकारी कार्यालये बंद ठेवायची, असं काही पाहावयास मिळालं. परंतु यादिवशी आम्ही सर्वांनीच कार्यालयात काम केलं. सर्व कामे व्यवस्थित पार पडली. कुठंही अडथळा आला नाही.
तात्पर्य, कोणतेही काम मनापासून केल्यास ते पूर्ण होतेच. परंतु येथील व्यवस्थेला ते होऊ द्यायचे नाही. इंग्रज, पोर्तुगीजांनी लादलेल्या गुलामगिरीसारखीच पारंपरिक पद्धतीतून वर्चस्व निर्माण करावयाचे आहे, असेच दिसते. मात्र, आपण विज्ञानवादी युगात वावरताना डाेळसपणे वावरलो तर स्वत:बरोबरच देशालाही नक्कीच फायदा होईल. अन् उदाहरण्ा घ्यायचेच झालेच तर याच आमावस्येच्या दिवशी इस्रोने मंगळयान सोडले, यातून आपण बोध घ्यायलाच हवा. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, आपणही या प्रगतीला विज्ञानवादी अनुकरणातून पुढे न्यायला सरसारवले पाहिजे, तरच आपला देशाचा नारा हा जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान असाच समर्पक राहील.
Comments