प्राचीन काळापासून वैविधतेने नटलेले औरंगाबाद. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. या राजधानीत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 27 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे यंदाचे ‘विकासाचे साधन शाश्वत पर्यटन’ असे घोषवाक्य आहे. या दिनानिमित्त औरंगाबाद पर्यटन राजधानीचा घेतलेला हा विकासात्मक आढावा. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. अजिंठा, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, पानचक्की, देवगिरी किल्ला यामुळे औरंगाबादकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षिले जातात. याशिवायही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाने पर्यटन विकासावर भर देण्यात येतो आहे. आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे 52 दरवाजांचे शहर म्हणूनही औरंगाबादची ओळख आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तूकलेचा, शिल्पकलेचा वारसा, विविध प्रकारच्या वन, वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद. युनेस्कोच्य...